डॉक्टर दाम्पत्याच्या लग्नाच्या वाढदिवसाला पोलिसांचे अनोखे सरप्राईज, गिफ्टमुळे भारावले डॉक्टर दाम्पत्य

पोलीस आयुक्तसाहेब माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. परंतु, सर्व दुकाने बंद असल्यामुळे मी केकसुद्धा मिळवू शकत नाही. उद्या आम्ही दाम्पत्य नेहमीप्रमाणे कामावर असणार आहोत. कृपया माझ्या बायकोसाठी भेटवस्तू सुचवा. अशाप्रकारे दंतरोग डॉक्टरने ट्वीटरवर विचारलेल्या प्रश्नाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी थेट केक पाठवून अनोखे गिफ्ट दिले आहे. औंध परिसरातील डॉक्टर दाम्पत्याला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी पुणे पोलिसांनी सकाळीच केक पाठवून सुखद धक्का दिला. कोरोनाच्या काळात पोलीसच केक घेऊन दारावर आल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि दाम्पत्याने पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

औंधमधील डॉ. अश्विन देशपांडे यांनी पुणे पोलीसांच्या ट्विटर हँडलवर शनिवारी लग्नाचा वाढदिवस असल्याचे ट्वीट केले होते. त्यामध्ये त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना टॅग करून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला काय गिफ्ट देऊ अशी विचारणा केली होती. दोघेही डॉक्टर असल्यामुळे दिवसभर क्लिनिकमध्ये असतो. पत्नीसाठी काय गिफ्ट घेऊ’ अशा आशयाचे ट्विट डॉ. अश्विन यांनी केले होते. ट्विटरवर पोलिसांचा फक्त काही तरी प्रतिसाद येईल, असे डॉ. अश्विन यांना वाटले होते. पण, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्टिटची दखल घेत डॉ. देशपांडे दाम्पत्याला सुखद धक्का दिला.

डॉ. अश्विन यांचा पत्ता शोधून पोलीस कर्मचाऱ्याला सकाळी त्यांना केक गिफ्ट पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळीच डॉ. देशपांडे दाम्पत्याच्या घरी जाऊन केक गिफ्ट केला. कोरोना कालावधीत लॉकडाउनमध्ये पोलीस स्वतः लग्नाच्या वाढदिवसाला केक घेऊन आल्यामुळे डॉक्टर दाम्पत्याला आनंद झाला. त्यांनी व्टिट करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. व्टिटची दखल घेत पोलीस आयुक्तांनी डॉक्टर दाम्पत्याचा दिवस स्मरणीय ठरविल्यामुळे नागरिकांनी कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या