पुण्यात नोकराने दिली मालकाला टांग, बँकेत जमा करण्यासाठी दिलेले 3 लाख रुपये घेऊन पोबारा

मालकाने विश्वासाने बँकेत भरण्यासाठी दिलेली रक्कम बँकेत न जमा करता कार्यालयातील कर्मचाऱ्याने ही रक्कम घेऊन पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दत्तात्रय जाधव (वय -28, रा. मांजरी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. निलेश जोशी (वय -42, रा. अमोनोरा पार्क, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जोशी  हडपसर भागात जागेची खरेदी- विक्री करण्याचे व्यवहार करतात. ते इस्टेट एजंट असून त्यांच्या कार्यालयात जाधव कामाला होते. दोन दिवसांपूर्वी जोशी यांनी जाधवकडे 3 लाख रुपयांची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी दिली होती. मात्र जाधवने ही रक्कम जोशी यांच्या बँक खात्यात जमा न करता रकमेचा वापर स्वतःच्या कामांसाठी केला. बँकेत पैसे जमा न झाल्याने  जोशी यांनी जाधवशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क झाला नाही. यावरून पोलिसांनी संबधित तरुणाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या