पुण्यातील नामांकित ‘रूफ टॉप’बारवर कारवाई, उत्पादन शुल्क विभागाचा दणका

परवाना देताना घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत नियमबाह्य पद्धतीने सुरू राहणाऱ्या शहरातील तब्बल 23 ‘रूफ टॉप’बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील महिनाभरात पथकांच्या माध्यमातून ‘रुफ टॉप’ची झाडाझडती घेवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यापुर्वी विभागाने रात्री उशीपर्यंत सुरू राहणाऱ्या 15 ते 20 हॉटेल, पबवर कारवाई केली होती.

शहरात हॉटेल, पब, बार, परमिट रूमची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना रात्री दीड पर्यंत परवानगी दिली जाते. मात्र, यानंतरही रात्री उशीरापर्यंत नियमभंग करत बार सुरू ठेवणाऱ्याची संख्या मोठी आहे. गेल्या महिन्यातच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरात तपासणी मोहीम राबवत रात्री उशीरापर्यंत सुरू राहणाऱ्या बड्या हॉटेल, पबवर कारवाई केली होती. यानंतर आता एलिशान अशा ‘रुफ टॉप’ बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात उंच अशा व्यावसायिक इमारतींवर अलिशान पद्धतीने ‘रुफ टॉप’ बार चालविले जातात. त्यांना परवाना देताना नियम घालून देण्यात आलेले असतात. याअंतर्गतच मंजूर नकाशा व्यतिरीक्त अन्य ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, अनेकजण हे परवाना कक्षाच्या बाहेर व्यवसाय करत असल्याचे तपासात समोर आले आहे. अशाप्रकारे परवाना कक्षाबाहेर अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या शहरातील 23 ‘रूफ टॉप’ बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. संबंधीत अस्थापनांना नोटीसा देण्यात आल्या असून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये कॅम्पातील हॉटेल कलेक्टीव्हीटी, कल्याणीनगरमधील हॉटेल नारंग व्हेन्चर्स, विमाननगरमधील अरोरा हॉस्पिटॅलीटी, कोंढव्यातील एस.आर.एन हॉस्पिटॅलीटी, टू व्हिलेज, महंमदवाडीतील पंजाबी बाय नेचर, वाल्हेकर हॉस्पिटॅलीटी, हॉटेल यूअर हायनेस, हॉटेल झिंग, खराडीतील हॉटेल टू डॉट्स, कॅफे कोका, कोथरूडमधील हॉटेल न्यूट्रीप्रीझम हॉस्पिटॅलीटी आदींचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधिक्षक चरणसिंह रजपूत, उप अधिक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे चरणसिह रजपूत यांनी सांगितले.

…स्थानिक पोलिसांकडून डोळेझाक
शहरात लेट- नाईट सुरू राहणाऱ्या हॉटेल, पब, बारवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असताना स्थानिक पोलिसांकडून मात्र हद्दीतील लेटनाईट अस्थापनांवर कारवाई करण्यात येत नाही. विशेषतः येरवडा, विमाननगर, मुंढवा या भागात अशा अस्थापनांची संख्या जास्त आहे. नूकतीच कल्याणीनगर भागातील बड्या पबवर कारवाई केल्यानंतरही ते रात्री उशीपर्यंत सुरू राहत असल्याचे समजते.