पुणे कसोटीची खेळपट्टी खराब होती

33

सामनाधिकाऱ्यांनी पाठविला ‘आयसीसी’कडे अहवाल
‘बीसीसीआय’कडे मागितले १४ दिवसांत स्पष्टीकरण

नवी दिल्ली- हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान पुण्यात झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी बनविण्यात आलेली खेळपट्टी अतिशय खराब दर्जाची होती, असा अहवाल सामनाधिकाऱ्यांनी ‘आयसीसी’कडे पाठवला. ‘आयसीसी’नेही या घटनेची गंभीर दखल घेत ‘बीसीसीआय’कडे याबाबत १४ दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे. अवघ्या अडीच दिवसांमध्ये संपलेली ही कसोटी ऑस्ट्रेलियाने ३३३ धावांनी जिंकली होती.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या कसोटीसाठी ख्रिस ब्रॉड हे सामनाधिकारी होते. त्यांनी २८ फेबुवारीला गहुंजेची खेळपट्टी अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचा अहवाल ‘आयसीसी’कडे सुपूर्द केला. आता ‘बीसीसीआय’कडून स्पष्टीकरण आल्यानंतर ‘आयसीसी’चे ज्योफ एलार्डिस व रंजन मदुगले पुढील तपास करतील. पुण्यातील खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीसाठी पोषक होती. समालोचकांनी पहिल्या दिवसाची खेळपट्टी तिसऱ्या दिवसासारखी रद्दाड असल्याचे म्हटले

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना खेळपट्टीवरील गवत काढण्यास सांगितले होते. सुरुवातीला क्युरेटर यांनी खेळपट्टीवरील संपूर्ण गवत काढण्यास नकार दिला. त्यानंतर ‘टीम इंडिया’च्या संघव्यवस्थापनाने खेळपट्टीसह समितीचे प्रमुख दलजीत सिंह यांच्याकडे खेळपट्टीवरील गवत हटविण्याची मागणी केली. क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी तरीही नकार दिल्यानंतर संघव्यवस्थापनाने ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्यांमार्फत दबाव टाकून खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल बनविली, मात्र या खेळपट्टीवर हिंदुस्थानी खेळाडूच ऑस्ट्रेलियन फिरकीच्या जाळ्यात सापडले.

आपली प्रतिक्रिया द्या