हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया लढतीने होणार पुण्यातील कसोटी क्रिकेट पर्वाचा श्रीगणेशा

पुणे : ‘आयपीएल’सह मर्यादीत षटकांच्या २९ सामन्यांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) गहुंजेतील स्टेडियम कसोटी क्रिकेट पर्वाच्या श्रीगणेशासाठी सज्ज झाले आहे. गहुंजे येथे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघांमध्ये २३ फेब्रुवारीपासून जेव्हा सलामीच्या कसोटी सामन्यास प्रारंभ होईल, तेव्हा पुण्याच्या क्रिकेट इतिहासाला आणखी एक मानाचे पान जोडले जाईल. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अभय आपटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘एमसीए’ची स्थापना १९३४ मध्ये झाली आणि त्यानंतर तब्बल ८२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे शहराला आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. शहरातील क्रिकेट रसिकांसाठी या कसोटीद्वारे ऐतिहासिक क्षण अनुभवायचा योग आला आहे. क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला हिंदुस्थानचा संघ आणि दुसऱ्या स्थानावर असणारा ऑस्ट्रेलिया संघ, अशा कसोटी क्रिकेटमधील दोन मात्तबर संघांमधील लढतीने हा सामना रंगणार आहे.

गहुंजेच्या ‘एमसीए’ स्टेडियमवर आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय एकदिकसीय, दोन आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी आणि २५ ‘आयपीएल’ टी-२० सामने असे एकूण २९ आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत. आता कसोटी सामना ऐतिहासिक करण्यासाठी एमसीए प्रयत्नशील आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या क्रिकेटपटूंना एमसीए तर्फे या कसोटी सामन्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंसाठीही हा एक मोठा ऐतिहासिक क्षण असणार आहे. याचबरोबर ‘एमसीए’च्या वतीने पुण्यातील सर्व शाळांना या कसोटी सामन्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच विकलांग शाळेतील मुलांसाठीही एमसीए तर्फे निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहितीही अभय आपटे यांनी दिली.

तिकीट विक्रीस १ फेब्रुवारीपासून प्रारंभ

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याची तिकीट विक्री १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पीवायसी हिंदू जिमखाना आणि एमसीए स्टेडियम, गहुंजे येथील बॉक्स ऑफीस येथे प्रत्यक्ष तिकीट विक्री होणार आहे. सामन्याचे सिझन तिकीट २१ फेब्रु.पर्यंत विक्रीस उपलब्ध असणार आहे. प्रत्येक दिवसाचे तिकीट (जर शिल्लक असेल तर) २२ फेब्रुवारीपासून विक्रीस खुले करण्यात येणार आहे.

तिकीटांचे दर

ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँड तसेच सिझन तिकीट (एक हजार रूपये.) व प्रत्येक दिवसासाठी (४०० रूपये). साऊथ अप्पर व सिझन तिकीट (दीड हजार रुपये) व प्रत्येक दिवसासाठी (६०० रुपये). साऊथ लोअर व सिझन तिकीट (अडीच हजार रूपये) व प्रत्येक दिवसासाठी (एक हजार रुपये). साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँड सिझन तिकीट (दोन हजार रुपये) व प्रत्येक दिवसासाठी (८०० रूपये). नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँड सिझन तिकीट (दोन हजार रूपये) व प्रत्येक दिवसासाठी (८०० रुपये). साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टँड : सिझन तिकीट (५ हजार रूपये) क प्रत्येक दिवसासाठी (२ हजार रुपये). कॉर्पोरेट बॉक्स : सिझन तिकीट (६२,५०० रुपये)आणि प्रत्येक दिकसासाठी (५० हजार रूपये).

आपली प्रतिक्रिया द्या