पुण्यातील संशयित तरुणीला सोडून दिले, दहशतवादी असल्याचा होता संशय

सामना ऑनलाईन, श्रीनगर

आयसिसच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी सुटलेली हादिया (बदललेले नाव) ही १८ वर्षांची तरुणी पुन्हा एकदा चौकशीतून सुटली आहे. कश्मीर खोऱ्यात प्रजासत्ताक दिनाच्या परेडदरम्यान आत्मघाती दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत एक तरूणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही तरूणी पुण्याची असल्याचीही त्यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांना हादियाला ताब्यात घेतलं होतं. तिची सखोल चौकशी केल्यानंतर ती आत्मघाती दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत नव्हती असं स्पष्ट झालंय, त्यामुळे तिला सोडून देण्यात आलं आहे.

हादियाच्या तपासामध्ये ती पुण्याहून जम्मू-कश्मीरमध्ये का आली हे पोलिसांनी तिला विचारलं. यावर तिने आपण नर्सिंग कॉलेजमध्ये दाखला घेण्यासाठी आलो असल्याचं तिने सांगितलं. जवळपास १० दिवस चौकशी केल्यानंतरही हादियाच्या जबाबात काही संशयास्पद वाटलं नाही, त्यामुळे तिला सोडून देण्यात आलं. हादिया तिच्या आईसोबत पुण्याला परतली असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितले आहे.