लष्करातील सुभेदाराचे घर फोडले; आगाखाना पॅलेससमोरील क्वाटर्समधील घटना

लष्कर क्वाटर्समधील सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 21 ते 22 सप्टेंबरला क्वाटर्समध्ये घडली.

याप्रकरणी हेमंतकुमार बंगवाल (वय 47, रा. घोरपडी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंतकुमार हे लष्करात सुभेदार आहेत. त्यांच्या बटालियनमधील एक जवान ट्रेनिंगसाठी गोवा येथे गेले होते. त्यांची पत्नी गावी गेल्यामुळे घर बंद होते. नेमकी संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

कपाटातील लॉकर तोडून 2 लाख 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, लष्कराची सुरक्षा भेदत चोरटे घरफोडी केल्यामुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करीत आहेत.