नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास यांचा अपघाती मृत्यू

661

माऊलींच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरहून दिवे घाटातून आळंदी देवाचीकडे निघालेल्या नामदेव महाराजांच्या पालखी सोहळयात अचानकपणे भरधाव जेसीबी शिरल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले, तर  15 वारकरी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नामदेव महाराजांचे 17 वे वंशज हभप सोपान महाराज तुलसीदास नामदास (35) यांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी सवाआठ वाजण्याच्या सुमारास वडकी गावच्या हद्दीतील दिवे घाटातील दुसऱया वळणावर घडला.

हभप अतुल आळशी (24)यांचाही या अपघातात  मृत्यू झाला. याप्रकरणी जेसीबी चालक निरंजन कुमार (रा. बिहार)  याला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर निवृत्तीराव कदम यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी संजीवन सोहळा आणि कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरहून आलेला नामदेव महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी रात्री सासवड गावी मुक्कामी होता. मंगळवारी सकाळची न्याहरी घेतल्यानंतर पालखी सोहळ्यातील 700 ते 800 वारकऱयांनी  वडकी गावच्या हद्दीतील दिवे घाटातून प्रस्थान केले.  घाटातील दुसऱया वळणावर पालखी सोहळा मार्गक्रमण करीत असताना पाठीमागून भरधाव आलेला जेसीबी चालक निरंजनने अचानक जेसीबी पालखी सोहळ्यात घातला. त्यामुळे वारकऱयांमध्ये खळबळ उडाली. जखमींना हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर अपघात टळला असता…

संत नामदेवांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर-फलटण-लोणंद-निरा-जेजुरी-सासकड-हडपसर मार्गे मंगळवारी पुण्यात दाखल होणार होता. शहरातील विश्रांतीनंतर दुसऱया दिवशी पालखी सोहळा  श्री क्षेत्र आळंदीकडे मार्गस्थ होणार होता. दरवर्षी निघणाऱया या वारीसाठी पोलीस प्रशासनाकडे वारंवार  संरक्षण मागण्यात आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. पोलीस संरक्षण मिळाले असते तर अपघात टळला असता अशी संतप्त प्रतिक्रिया सोहळ्यातील वारकऱ्यांनी दिली.

या दुर्घटनेमुळे सर्व वारकरी संप्रदायावार शोककळा पसरली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांवर अंतिम क्रियाकर्म करुन माउलींचा समाधी सोहळा सुरुच राहणार असल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

दुर्घटनेतील वारकऱयांना मदतीची मागणी

दुर्घटनेत जखमी झालेल्या वारकऱयांना आर्थिंक मदत मिळणे  गरजेचे आहे. आळंदी नगरपालिकेने यात्रा निधीतून जखमी वारकऱयांना मदत करण्याची मागणी आळंदी विकास युवा मंचाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱयांची विचारपूस केली.

दुचाकीस्वारालाही धडक

पालखी सोहळ्यातील अपघातापुर्वी याच जेसीबी चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली होती. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी चालकाला  पालखी सोहळा पुढे गेल्याशिवाय जेसीबी चालवू नको असे बजावले होते. मात्र, पालखी सोहळा दिवेघाटातील अर्ध्या वाटेत असताना चालकाने अरूंद रस्त्यातून जेसीबी चालवून थेट वारकऱयांच्या अंगावर घातला. अशी माहिती दिंडी बरोबर असलेले प्रत्यक्षदर्शी राहूल बंडगर यांनी दिली.

जखमी वारकऱ्यांची नावे

विष्णू सोपान हुलकळ (35), शुभम नंदकिशोर आवारे (23), दीपक अशोक लासुरे (19), गजानन संतोष मानकर (20), वैभव लक्ष्मण बराटे (28), अभय अमृत मोकमपल्ले (19), कीर्तिमान प्रकाश गिरजे (23), आकाश माणिकराव भट्टे (30), ज्ञानेश्कर निवृत्तीराव कदम (40), गोरोबा जडगे (35),  विनोद लहासे (30), नामदेव सागर (34), सोपान म्हासाळकर (25), गजानन सुरेश मानकर (20),  सोपान निमनाथ मासळीकर (25)

आपली प्रतिक्रिया द्या