पती आणि मुलांना ट्रकमध्ये कोंडून सामूहिक बलात्कार, 7 वर्षानंतर पीडितेला मिळाला न्याय

5755
प्रातिनिधिक फोटो

पुण्यातील कासुर्डी टोलनाक्यावर झालेल्या सामूहिक बलात्कारातील पीडितेला सात वर्षानंतर न्याय मिळाला आहे. या प्रकरणी बारामती सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला असून सामूहिक बलात्कार, अपहरण आणि जबरी चोरीप्रकरणी तीन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अशोक आत्माराम येडके, गणेश सुभाष वैरागे आणि गौरव गंडप्पा जमादार अशी आरोपींची नावे आहेत.

पुण्यामधील कासुर्डी टोलनाक्याजवळ 22 नोव्हेंबर 2012 रोजी पीडितेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. पीडित महिला पती आणि मुलांसह ट्रकने सोलापूरहून पनवेलला जात होती. त्यावेळी पोलीस असल्याचे भासवून आरोपींनी त्यांचा ट्रक थांबवला. यानंतर पीडित महिलेचा पती आणि मुलांना आरोपींनी चाकूच्या धाकाने केबिनमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर पीडितेला ट्रकच्या पाठी नेत तिघांनी सामूहिक बलात्कार केला.

गेल्या 7 वर्षांपासून हा खटला न्यायालयामध्ये प्रलंबित होते. अखेर याप्रकरणी निकाल लागला असून बारामतीचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयानेकलम 376 2 (जी) आणि 394 नुसार तिघा आरोपींना आजन्म कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा आरोपींना भोगावी लागणार आहे.

टोलनाक्यावर लूटमार
आरोपींनी टोलनाक्यावर पीडितेवर बलात्कारासह लूटमार केल्याचेही पोलीस तपासामध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे लुटलेल्या व्यक्तींचे ओळखपत्र घटनास्थळी टाकून त्यालाच आरोपी म्हणून भासवण्याचा प्रयत्न आरोपी करत होते.

आपली प्रतिक्रिया द्या