पाच वर्षाच्या मुलाच्या अभ्यासावरून झाला वाद, पतीने पत्नीच्या डोक्यात घातला कॅरमबोर्ड

ऑनलाइन क्लास सुरू असताना मुलगा लक्ष देत नसल्याच्या कारणावरून चिडलेल्या पतीने पत्नीला रॉडने मारहाण करत तिच्या डोक्यात कॅरम बोर्ड घातला. हा धक्कादायक प्रकार कोंढवा खुर्द येथे घडला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला आणि आरोपी पती-पत्नी असून, त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमीवर शाळा बंद असल्याने त्यांच्या मुलाची शाळा ऑनलाइन सुरू आहे. 26 जुलैला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुलाचा ऑनलाइन क्लास सुरू होता. मात्र, मुलाचे क्लासकडे लक्ष नव्हते. त्यामुळे आरोपी मुलाला ओरडला. ‘तू टाइमपास करतोय. तुझे अभ्यासाकडे लक्ष नाही. मी तुझा मोबाईल फोडून टाकेन,’ असे बोलून मुलासमोरील मोबाईल उचलून बंद केला. त्यानंतर बाथरूममधील पाण्याची बादली तोडली. त्यावर तक्रारदार महिलेने पतीला ‘शांत रहा,’ असे सांगितले. त्याचा आरोपीला राग आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करून हाताने तोंडावर आणि नाकावर मारले. घरातील एका रॉडने हात आणि पायावरही मारले. त्यानंतर घरातील कॅरम बोर्ड पत्नीच्या डोक्यात मारला. यात तिच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकारानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. कोंढवा पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या