पुणेकराची बायको,मुलाविरोधात न्यायालयात धाव; घरातून हाकलून देत संपत्ती हडपल्याचा आरोप

1712

पुण्यातील 65 वर्षांच्या वकिलाने त्याच्या बायको आणि मुलाविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. आपली संपत्ती हडपून आपल्याला घरातून हाकलून दिल्याचा आरोप या वकिलाने केला आहे. शामराव पोफळे नावाच्या या वकिलांनी हडपसर पोलीस हे आपल्याला सहकार्य करत नसल्याचाही आरोप केला आहे. आपण पोलिसांकडे मदत मागितली होती, मात्र आपल्याला ती मिळाली नाही असं या वकिलाचे म्हणणे आहे.

पोफळे हे पुणे तसेच साताऱ्यातील सत्र न्यायालयात 40 वर्ष वकिली करत आहेत. आपल्याला हृदयविकाराचा झटका आला होता, अर्धांगवायूचा झटका आला होता ज्यामुळे आपण नीट चालू शकत नाही असं पोफळेंचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीतही आपली बायको, दोन मुलं सुना आपल्याला त्रास देतात, नीट वागत नाही असं पोफळेंचं म्हणणं आहे. आपल्याला घरची मंडळी 3-4 दिवस उपाशी ठेवतात, खायला दिलं तर शिळं अन्न देतात असा त्यांचा आरोप आहे. जी औषधं घेणं गरजेची आहे ती आपला मुलगा आणून देत नाही असाही आरोप त्यांनी केला आहे.

पोफळे यांनी मुलावर आणखी एक आरोप करताना म्हटलं आहे की त्याने त्यांत्याकडून 7.64 लाख रुपये घेतले होते. परत करण्याच्या बोलीवर त्याने हे पैसे घेतले होते, मात्र आता तो ते पैसे परत देत नाहीये. त्यांच्या मोठ्या मुलानेही 6.4 लाख रुपये घेतले असून ते देखील परत केले नसल्याचं पोफळे यांनी म्हटलं आहे. पैसे परत मागितल्यानंतर एका मुलाने हात तोडून टाकीन अशी धमकी दिली तर दुसऱ्याने घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती असं त्यांचं म्हणणं आहे.

पुणे मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना पोफळे म्हणाले की “मी माझ्या बायकोला आणि मुलांना हवं ते दिलं मात्र आता त्यांनीच मला घराबाहेर काढलं. बायको, मुलं आणि सुनांनी मिळून गँग बनवली असून ते मला त्रास देतात. मी मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते मला शिवीगाळ करतात” पोफळे यांच्या कुटुंबियांनी त्यांना 2019 पासून एकटं पाडायला सुरुवात केली असा त्यांनी आरोप केला आहे. मला त्यांनी घराबाहेर काढलं आणि माझ्याकडील सोनं-नाणं पैसा काढून घेतला असाही आरोप त्यांनी केला आहे. पोफळे यांच्या वकिलांनी न्यायालयात एक खासगी तक्रार दाखल केली आहे. पोलीस मदत करत नसल्याने न्यायालयाने मदतीसाठी निर्देश द्यावेत अशी याद्वारे विनंती करण्यात आली आहे. पोफळेंची दोन्ही मुले ही कमावती असून त्यांनी वडिलांच्या देखभालीचा खर्च उचलायला हवा असं या याचिकेत म्हटलं आहे.या आरोपांबाबत पोफळेंचा मुलगा स्वप्नील याने सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या वडिलांनी आईला खूप त्रास दिला होता, त्यांनी मला मारण्यासाठीही एका व्यक्तीला सुपारी दिली होती असं स्वप्नीलने म्हटलं आहे. आम्ही वडिलांना घराबाहेर काढलं नसून उलट त्यांनीच आम्हाला घराबाहेर काढलं असं त्याने म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या