पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारच्या लोकल दुरुस्तीसाठी जुलैमध्ये रद्द

41

सामना प्रतिनिधी । पुणे

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील देखभाल-दुरुस्तीचे काम १ ते २७ जुलै या कालावधीत सुरू केले जाणार असून, दुपारच्या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, दोन्ही मार्गावरील गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

लोणावळा रेल्वे मार्गाच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे एक ते ३० जून या कालावधीत दुपारच्या वेळेतील सहा लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. आता चार लोकल रद्द केल्या आहेत. त्यामध्ये सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी सुटणारी शिवाजीनगर-लोणावळा लोकल, दुपारी एक वाजता सुटणारी पुणे-लोणावळा लोकल आणि लोणावळ्याहून सकाळी साडेअकरा आणि दुपारी दोन वाजता सुटणारी लोकल रद्द केली आहे, तसेच तळेगाव स्थानकातून सकाळी नऊ वाजून ५७ मिनिटांनी सुटणारी लोकल शिवाजीनगरऐवजी पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे.

पुणे-दौंड मार्गावर दररोज दुपारी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बारामती-पुणे पॅसेंजर (५१४५२), पुणे निजामाबाद पॅसेंजर (५१४२१) अनुक्रमे पुणे ते दौंड आणि दौंड ते पुणे या दरम्यान धावणार नाहीत. अमरावती-पुणे एक्स्प्रेस (११०४६) या कालावधीत दर मंगळवारी दौंड स्थानकात ५० मिनिटे आणि दर रविवारी एक तास ५० मिनिटे थांबविली जाणार आहे. हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस (१७०१४) दर बुधवारी दौंड स्थानकात एक तास ५० मिनिटे आणि सोमवारी आणि शनिवारी सव्वातास थांबणार आहे. जबलपूर-पुणे विशेष गाडी (०१६५६) सोमवारी दौंड स्थानकात ५० मिनिटे थांबेल. दरम्यान, मांजरी आणि हडपसर स्थानकांच्या दरम्यान मांजरी येथे असलेले रेल्वे फाटक देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे एक जुलैला सकाळी आठ ते तीन जुलै रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या