पुणे – ज्येष्ठाच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी, मृतदेहाला अंघोळ घालून पाणी प्यायल्याचा प्रकार

ज्येष्ठ नागरिकाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी 100 पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातल्या लोणी काळभोरमधील कदमवाक वस्तीवर घडली आहे.

त्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला अंघोळ घालून नातेवाईकांनी ते पाणी प्यायल्याचा प्रकारही घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडून घटनास्थळी पोलीस पथक पाठवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाक वस्तीवर असलेल्या एका 70 वर्षीय ज्येष्ठाचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला. मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाला नातेवाईकांकडून अंघोळ घालण्यात आली. नातेवाईकांनी ते पाणी प्यायल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 100 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. दरम्यान, दरम्यान या घटनेची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.

कदमवाक वस्तीवर एका जेष्ठ नागरिकाचा दुर्धर आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी समाजातील रीती परंपरेनुसार मृतदेहाला अंघोळ घालून पाणी प्यायले आहे. दरम्यान, संबंधिताचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही. मात्र, अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक नागरिक उपस्थित असल्याचे कळले आहे. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठविण्यात आले असून तपास करण्यात येत आहे. अंत्यसंस्कारात कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

-राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या