अखेर ‘त्या’ जुळ्या मुलांचे आई-बाबा सापडले, प्रेमप्रकरणातून झाला होता जन्म

2691

गेल्या आठवड्यात (14 जानेवारी) पुण्यामधील पाषाण तलावाजळ पहाटेच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला होता. दोन दिवसांच्या जुळ्या बाळांना आई-वडील बेवारस टाकून फरार झाले होते. बाळाच्या रडण्याच्या आवाज ऐकून फिरायल्या आलेल्या लोकांनी आणि सुरक्षा रक्षकांनी शोध घेतला असता त्यांना जुळी बाळं आढळली होती. यानंतर त्या बाळांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून पोलीस या बाळांच्या पालकांचा शोध घेत होते. अखेर आठ दिवसांनी चतु:श्रुंगी पोलिसांनी जुळ्यांच्या पालकांना शोधून काढले आहे. प्रेमप्रकरणातून या बाळांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ 14 जानेवारीला सकाळी 2 दिवसांच्या जुळ्या बाळांना आई-वडील बेवारस टाकून निघून गेल्याचे समोर आले होते. तलाव परिसरातील सुरक्षा रक्षकांना आणि फिरायला आलेल्या नागरिकांना ही मुले सापडली होती. थंडीच्या कडाक्यामध्ये कुडकुडणाऱ्या या मुलांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आणि त्यांच्या पालकांचा शोध सुरू झाला. जुळ्या मुलांच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली. तपासानंतर चतु:श्रुंगी पोलिसांना मुलांच्या पालकांना शोधण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, धायरी परिसरात संबंधित आई-वडील लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात. संबंधित महिला विधवा असून याआधीच तिला तीन मुलीही आहेत. लिव्ह इनमध्ये असताना गर्भवती राहिलेल्या महिलेने बाळांच्या जन्मानंतर त्यांना तलावाजवळ सोडून दिले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून जुळ्या मुलांच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे.

असा लागला शोध
पोलिसांनी शहरातील कोणत्या रुग्णालयात जुळ्यांचा जन्म झालाय का याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी वारजे रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याचे पोलिसांनी समजल. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पत्ता मिळून शोध घेतला असता धक्कादायक सत्य समोर आले. आरोपी महिला विधवा असून ती एका रिक्षाचालकासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. दोघांनाही बाळांना सांभाळायचे नव्हते त्यामुळे त्यांनी जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी पाषाण तलावाजवळ सोडून दिल्याचे उघड झाले.

आपली प्रतिक्रिया द्या