पुणे : गॅस सिलेंडरच्या स्फोटात जेष्ठ दांपत्य भाजले

प्रतिकात्मक छायाचित्र

घरात सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत जेष्ठ दांपत्य भाजल्याची घटना आज सकाळी कसबा पेठेत घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. दांपत्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

ठाकरशी त्रिभवन सोळंखी (वय 90), वसंतबाई सोळंखी (वय 86) अशी जखमी झालेल्या जेष्ठ नागरिकांची नावे आहेत.

सोळंखी दाम्पत्य कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीजवळ एका इमारतीत राहतात. इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांची खोली आहे. काल रात्री सिलिंडर लिकेज झाला होता. त्यामुळे आज सकाळी त्यांनी पाणी तापवण्यासाठी गॅस सुरू केला असता, त्याचा भडका उडाला. गॅसचा स्फोट झाल्यामुळे दोघेही पती- पत्नी गंभीर जखमी झाले. भडका इतका मोठा होता की घरातील काचा फुटून भांडे उडाले होते.

नागरिकांनी घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर कसबा अग्निशमन केंद्राचे अधिकारी सुनील नाईकनवरे, कुंभार, दळवी, गायकवाड, वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

जेष्ठ नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

आपली प्रतिक्रिया द्या