पहाटे 6 वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पहाणी, उपमुख्यमंत्र्यांनी दिली संपूर्ण सहकार्याची ग्वाही

ajit-pawar-pune-metro-visit

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सहा वाजता संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसह मेट्रोचे काम सुरू असणाऱ्या विविध स्टेशनला प्रत्यक्ष भेटी देऊन कामाची पाहणी केली. त्यांनी संत तुकारामनगर ते पिंपरी असा मेट्रोचा प्रवासही केला. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पुणे मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष भेट देत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आज मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकारामनगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने प्रवास करत तिकीट व्यवस्थापनाची माहिती घेतली. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी करत कामकाजाचा आढावा घेतला. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे मेट्रोच्या कामाची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिव्हील कोर्ट, नळस्टॉप, लकडी पूल व स्वारगेट येथील मेट्रोच्या स्टेशनला भेट देत कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आधुनिक पद्धतीने बोगदा खोदकाम करणाऱ्या टनेल बोअर (टी. बी.एम.) मशिनचे मेट्रो कामासाठी लोकार्पणही अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मेट्रोच्या गौतम बिऱ्हाडे, श्रीमती सरला कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या