शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाला राज्य सरकारची मंजुरी

सामना प्रतिनिधी । पुणे

बहुचर्चित मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल २३ कि.मी लांबीच्या मार्गाला राज्यसरकारच्या मंत्रीमंडळाने आज मंजुरी दिली. तब्बल ८हजार ३१३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प अवघ्या ४८ महिन्यात पुर्ण केला जाणार आहे.

पुणे शहरातील बहुचर्चित मेट्रोचे काम सध्या सुरु आहे. मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी व वनाज ते रामवाडी हा प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील ३१ कि.मी. मार्गाला यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे. मेट्रोचा विविध प्रकल्पांसाठी नव्या वर्षात साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षीत आहे. शासनासह विविध वित्तीय संस्थांकडून हा निधी मिळणार आहे. त्यातच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रोमार्गावर एकूण २३ स्थानके असतील. सार्वजनिक व खाजगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन आणि पी.एम.आर.डी.ए. यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने नोव्हेंबर २०१६ मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार केला तो डिसेंबर २०१६ मध्ये पीएमआडीएच्या सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचा कालावधी ४८ महिन्यांचा असून तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी ७६४ प्रवासी प्रवास करु शकतील.

या प्रकल्पाचा एकूण खर्च ८३१३ कोटी रुपये असून त्यापैकी केंद्र सरकार ११३७ कोटी रुपये देणार आहे. तर राज्य सरकारचा हिस्सा ८१२ कोटी रुपयांचा असणार आहे आणि उर्वरित रक्कम खाजगी भागीदारीतून उभी केली जाणार आहे. २०२१ मध्ये २ लाख ६१ हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळेल असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. ५० लाखाहून अधिक पुणेकरांना महामेट्रोचा लाभ मिळणार असून या प्रकल्पाची कामे वेळेपूर्वीच संपविण्याचा प्रयत्न असल्याचेही बापट यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या