अंतर्वस्त्राचा रंग ठरवणाऱ्या शाळेची चौकशी होणार

32

सामना ऑनलाईन। पुणे

विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्राचा रंग ठरवणाऱ्या कोथरुड येथील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकूल शाळेची चौकशी करण्यात येणार आहे. शाळेने विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्राचा रंग ठरवण्याचा आचरटपणा केल्याने पाल्य व पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याविरोधात शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्यातील शिक्षण उपसंचालक एक समिती शाळेत पाठवणार आहेत. ही समिती विद्यार्थी व पालकांना भेटून एक अहवाल तयार करेल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

कोथरुड येथील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकूल शाळेत ३० जूनला शाळेच्या डायरीत एक सूचना देण्यात आली होती. ज्यात यापुढे विद्यार्थिनींना फक्त सफेद आणि त्वचेच्या रंगाशी साम्य असलेली अंतर्वस्त्र घालावीत असे सूचित करण्यात आले होते. विशेष म्हणजे अंतर्वस्त्रांसाठी लागू करण्यात आलेला हा ड्रेसकोड मुलांना मात्र लागू करण्यात आला नव्हता. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर याप्रकरणी पालकांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांकडे तक्रारी देखील केल्या. त्याची दखल घेत राज्य सरकारने शाळेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या