शहर आणि परिसरात मंगळवारी रात्री पावसाने शहरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह धुवाँधार हजेरी लावली. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांसह उपनगरांमध्ये रात्री पाणीच पाणी झाले होते. शहरातील अनेक वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. तर, अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. ऐन झोपेच्या वेळी अनेकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही काळ ऊनही पडले होते. रात्री पावसाने जोरदार वाऱ्यासह शहरात हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी रात्री पावसाने शहराला झोडपून काढले. येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, बावधनजवळील टोयोटा शोरूमजवळ, धनकवडी येथील शिवशंकर चौक, विश्रांतवाडी येथील सावंत पेट्रोलपंप, लोहगावातील साठे वस्ती, खडी मशिन चौकातील अंगराज ढाबा परिसर या ठिकाणी रात्री पाणी शिरले. वडगाव शेरी रामवाडी गावातील डिसेंट सोसायटीची सीमाभिंत या मुसळधार पावसाने कोसळली. कोंढव्यातील सोसायटीत ड्रेनेजचे पाणी शिरले. शहरात जूनपासून २४ सप्टेंबरपर्यंत तब्बल ९३१.० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण सरासरीच्या ३७१ मि.मी.ने जास्त आहे. पावसाळ्यातील गेल्या १४ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. २००५ मध्ये चार महिन्यांत १९६३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याचे हे दुसरे वर्ष आहे.