Pune news : मनोरमा खेडकर यांना आणखी एक झटका, अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस जारी

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांनंतर त्यांची आई मनोरमा खेडकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मनोरमा यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुणे महापालिकेने नोटीस बजावली आहे. खेडकर यांच्या बाणेर येथील बंगल्याजवळील अनधिकृत बांधाकामाप्रकरणी त्यांना नोटीस देण्यात आली आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सायंकाळी महापालिकेच्या अधिकारी खेडकर यांच्या ओम दीप बंगल्यावर गेले. अधिकाऱ्यांनी बराच वेळ दरवाजाची बेल वाजवली. मात्र खेडकर यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर अधिकाऱ्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजावर नोटीस चिकटवली आहे.

बंगल्याच्या संरक्षक भिंतीजवळील अनधिकृत बांधकाम सात दिवसाच्या आत तोडण्याचे आदेश या नोटिशीत देण्यात आले आहेत. दरम्यान, जमिनीच्या वादातून बंदूक दाखवून शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर यांच्यासह सात जणांवर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.