पालिकेच्या स्क्रॅपविक्रीत गोलमाल

17

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे महापालिकेच्या विविध विभागांतील स्क्रॅपविक्रीच्या निविदेत ‘गोलमाल’ करण्यात आला आहे. निविदेच्या कागदपत्रांमध्ये वर्णन केलेल्या मालाचे वजन आणि प्रत्यक्षातील मालाचे वजन यामध्ये मोठी विसगंती होती. त्यामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

पुणे महापालिकेच्या विविध विभागांत दरवर्षी स्क्रॅप झालेले साहित्य, वस्तूंची निविदा काढण्यात येते. त्यात भंगार, नादुरुस्त वाहने, टायर, स्पेअर पार्ट्स, नादुरुस्त मटेरियल, नादुरुस्त संगणक, प्रिंटर, फर्निचर आदींचा समावेश असतो. या स्क्रॅपसाठी २०१७ – १८मध्ये निविदा काढण्यात आली. मात्र, या निविदेच्या कागदपत्रांमध्ये आणि वर्णन केलेल्या मालाचे वजन आणि प्रत्यक्षातील मालाचे वजन यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती होती. त्यामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. भाजपच्या एका नगरसेविकेच्या नातेवाईकाने ही निविदा घेतली आहे. त्यासाठी पालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचा आरोप केला जात आहे.

तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या आक्षेपार्हचे काय?
महापालिकेने २०१७-१८मध्ये काढलेल्या निविदा प्रक्रियेवर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी आक्षेपार्ह शेरे मारले होते, त्याचे काय झाले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मोटार वाहन विभागाला अधिकार आहेत का?
पालिकेच्या सर्व विभागांतील स्क्रॅपविक्रीचे अधिकार मोटार वाहन विभाग यांना आहेत का? याचा खुलासा शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी मागितला आहे. स्क्रॅप मालाचे वजन करण्याची प्रशासनाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती द्यावी. मालाच्या मूल्यांकनाची पद्धत काय आहे ? असा प्रश्न ओसवाल यांनी विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या