रस्ता चुकल्याने क्लिनरने चालकाचा केला खून, लोणीकंद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

रस्ता चुकल्याने झालेल्या वादातून ट्रकमधील क्लिनरने चालकाच्या डोक्यात गज मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नगर रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी नाशिक परिसरातून क्लिनरला अटक केली.

शमशुल अलीअहमद खान (वय 26, रा. चायकला, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, शहजाद अब्दुलकयूम अहमद (वय 26, रा. पोखर मिटवा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याबाबत संजय रामफल कालीरामना (वय 26, रा. शुभम ग्रीन सिटी, बलसाड, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. कालीरामना यांचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ट्रकवर आरोपी शमशुल क्लिनर म्हणून, तर शहजाद ट्रकचालक म्हणून काम करत होता. दोघे कंटेनर घेऊन पुणे-नगर रस्ता परिसरातील तुळापूर ते लोणीकंद या रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी ट्रकचालक शहजाद वाट चुकला. या कारणावरून शहजाद आणि क्लिनर शमशुल यांच्यात वाद झाला. यातूनच शमशुलने ट्रकमधील लोखंडी गज शहजादच्या डोक्यात मारला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शहजादचा ट्रकच्या केबीनमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर शमशुल पसार झाला.

ट्रक न पोहोचल्याने ट्रकमालक कालीरामना यांनी दोघांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. दोघांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले. चौकशीत ट्रक तुळापूर ते लोणीकंद रस्त्यावर थांबला असून, ट्रकचालक शहजादचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास केला, तेव्हा आरोपी शमशुल नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला नाशिकमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गजानन जाधव, निखिल पवार, अंमलदार कैलास उगले, बाळासाहेब सकटे, कैलास साळुंखे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.