पुण्यात राष्ट्रवादी नगरसेविकेच्या मुलाला मारण्याची धमकी देत मागितली खंडणी, एकाला अटक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेच्या मुलाला जीवे मारण्यासाठी साडेसहा लाखांची सुपारी मिळाली आहे. जर 40 हजार रूपये नाही दिले तर तुला ठार मारू अशी धमकी देउन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला खंडणी विरोधी पथकाने कर्जतमध्ये जाऊन अटक केली.

सचिन मारूती शिंदे (वय 32, रा. कर्जत, रायगड, मूळ-तरडगाव फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी युवराज नारायण लोणकर यांनी तक्रार दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका नंदा लोणकर यांचा मुलगा युवराज लोणकर यांना काही दिवसांपूर्वी आरोपीने फोन केला. पुण्यातील एका गुंडाने तुला मारण्यासाठी 6 लाख 50 हजारांची सुपारी दिली आहे. तू जर मला 40 हजार रूपये दिले नाहीस, तर मी तुला ठार मारेन, अशी धमकी युवराजला दिली होती. त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाने तक्रार केली होती.

पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपी कर्जत रायगडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप बुवा यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी सचिन शिंदे याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने पैशांची चणचण भासल्यामुळे युवराज लोणकर यांना फोन करून खंडणीची मागणी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, एपीआय संदीप बुवा, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, रवींद्र फुलपगारे, संजय भापकर, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, दुर्योधन गुरव, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, अमर पवार, हनुमंत कांदे, संदेश निकाळजे, ऋषीकेश महल्ले, सचिन कोकरे, पिराजी बेले यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या