Pune News – भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ, अंगणात खेळणाऱ्या मुलाला बिबट्याने ओढून नेले

अंगणात खेळत असताना 13 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत उसाच्या शेतात ओढून नेल्याची घटना शिरूर तालुक्यात घडली. यात चिमुरड्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडण्याची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाची गाडीच पेटवून दिली. रोहन विलास उर्फ बाळू बोंबे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

पिंपरखेड दत्तवाडी येथे सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास विलास बोंबे यांचा 13 वर्षीय मुलगा रोहन अंगणात होता. यादरम्यान जवळच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ओढत नेले. शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने गावकऱ्यांनी धाव घेत मुलाचा शोध घेतला असता जवळच्या उसाच्या शेतात मुलगा मृतावस्थेत आढळला. रोहनच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रोहनच्या मृत्युनंतर पिंपरखेड ग्रामस्थ आक्रमक झाले असून राज्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री येथे येत नाही तोपर्यंत मृतदेह घरासमोरच ठेवला जाणार आहे. मुलाचे शवविच्छेदन करण्यात येणार नाही, कोणताही विधी करण्यात येणार नाही. जीव धोक्यात घालून आता काम करणे शक्य नसल्याने बिबट्याला मारण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी शेतकरी व सर्वसामान्य नागरिक करीत आहे.