#GOODBYE 2019 शहरात सामसूम, बाहेरगावी धूम; पुण्यालगतचे रिसॉर्ट फुल्ल

प्रातिनिधिक फोटो

नाताळ नंतर अनेकांना वेध लागतात ते नवीन वर्षाच्या स्वागताचे. थर्टीफर्स्ट एन्जॉय करून नव्या वर्षाच्या स्वागताचा शहरात माहोल तयार झाला आहे. सरत्या वर्षाला निरोपासह नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे. शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे बेत आखण्यात आले असून गीत संगीत व नृत्याच्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर रेलचेल आहे.

शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून नववर्षाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. हॉटेलची सजावट विद्युत रोषणाईचा झगमगाट वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची जाहिरात करून खवय्यांना आकर्षित केले जात आहे. गेल्या काही वर्षात थर्टी फर्स्टला सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड दिली जात आहे. यावर्षीही हा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

नववर्षासाठी पार्टी आयोजित करणारे नॉर्मन शॉनफिल्ड यांनी या संदर्भात सांगितले की प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करत असतो. त्यामध्ये शहरात डेक्कन भागातील हॉटेलमध्ये कौटुंबिक पद्धतीने सेलिब्रेशन करणाऱ्यांची संख्या अधिक असते. हॉटेलमध्ये डीजे पार्ट्यांचे प्रमाण कमी असते, कारण दारु परवाना घेणे आहे खूप महाग झाले आहे. विमाननगर, कोरेगाव पार्क या भागातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये बार आणि रेस्टॉरंट ची संख्या अधिक असल्याने तरुण या भागांमध्ये पार्टी करण्यासाठी अधिक प्राधान्य देतात.

यासंदर्भात इव्हेंट आयोजक आशुतोष जारे म्हणाले की नवीन वर्षाचे स्वागत आपल्या मित्रमंडळींसोबत करण्याच्या सध्या ट्रेंड निर्माण झाला आहे. पुण्यामध्ये कॉस्मोपॉलिटन संस्कृती रुजत आहे त्यामुळे शहरातील पंचतारांकित हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या नृत्य आणि संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जे.डब्ल्यू. मॅरियट मध्ये ‘ न्यू ऑन’  कार्यक्रमात अनेक देश विदेशातील गायक सादरीकरण करणार आहेत. डी.पी रोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे बॉलिवूड कार्निव्हलमध्ये मानसी नाईक आणि उर्वशी रौतेला यांच्या गाण्यांचे कार्यक्रम होणार आहेत.  सेनापती बापट रोड वरील जे डब्ल्यू मॅरियट मध्ये डीजे शनाया, विमान नगर मधील माफिया स्काय लाऊंज मध्ये डीजे हरीश, हडपसर मधील अमानोरा पार्क मध्ये डीजे मारिया, मुंढवा येथील द प्रिंट हाऊस येथे डीजे अभिजीत यांच्यासारख्या अनेक ठिकाणी तरुणाईला आकर्षित करण्यासाठी परदेशी डीजेंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

राज्यात 31 डिसेंबर ला पहाटे पाच वाजेपर्यंत बार सुरू राहणार आहे तर वाईन शॉप रात्री एक वाजेपर्यंत खुले राहणार आहेत यामुळे हॉटेल बार आणि रेस्टॉरंट मध्ये अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे अशी माहिती आशुतोष जारे यांनी दिली आहे.

समुद्र किनाऱ्यांनाही पसंती
अनेक नागरिकांनी समुद्रकिनारी रिसॉर्ट बुक करून फॅमिली आणि मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगार, आंजर्ले, कर्दे, मुरुड या भागातील रिसॉर्टला अधिक मागणी आहे याठिकाणी प्रतिव्यक्ती किमान तीन ते पाच हजार रुपये भाडे आकारण्यात येत आहे असे नॉर्मन शॉनफिल्ड यांनी सांगितले.

शहरालगतचे रिसॉर्ट फुल
शहरातील हॉटेलांबरोबरच शहराजवळ 50 किलोमीटरच्या परिसरात असणाऱ्या भोर, लोणावळा, खंडाळा, कर्जत डोणजे, लोणावळा इमेजिका पार्क याठिकाणी असणाऱ्या रिसॉर्ट ही नाताळ पासून सलग आठ ते दहा दिवसांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. या परिसरामध्ये तीनशे ते पाचशे रिसॉर्ट आहेत आणि कॉर्पोरेट फॅमिली प्रकारच्या बुकिंगला अधिक मागणी असते. यामध्ये प्रतिव्यक्ती दीड ते सहा हजार रुपयांपर्यंत पॅकेज देण्यात आले आहे.

थर्टी फर्स्ट साजरा करताना नागरिकांमध्ये उत्साह असला तरी महागाई आणि मंदीमुळे पार्टी करताना नागरिकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. मंदी आणि महागाईमुळे खाद्य पदार्थांपासून ते मद्याच्या किमती वाढलेल्या आहेत. तसेच मध्य परवाने देखील महागल्याने हॉटेलांना दारू पार्ट्यांचे आयोजन करणे परवडत नाही. हॉटेलमधील पार्टी आणि सर्वसामान्यांसाठी खर्च झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा दर्जाप्रमाणे 500 ते 2000 रुपये हॉटेल महागली आहेत. त्यामुळे शहरांमध्ये मुख्यत: दारूविना पार्टी हॉटेलांनी आयोजित केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा आणि विशेषत: तरुणाईचा हिरमोड झाला आहे. शहरातील इव्हेंटची संख्याही यामुळे कमी झाली आहे. दारू पार्टी याची मजा लुटण्यासाठी शहरालगतच्या रिसॉर्ट बार हॉटेल यांचे बुकिंग मात्र पूर्ण झाले आहे असे नॉर्मन शॉनफिल्ड यांनी सांगितले.

धरणालगत टेन्ट रिसॉर्टला विशेष मागणी
खडकवासला, पानशेत, वरसगाव, पवना डॅम परिसर या परिसरामध्ये असलेल्या डॅम बॅकवॉटर रिसॉर्टमध्ये थर्टीफर्स्ट पार्टी करण्यासाठी अनेकांनी पसंती दिली आहे. यामध्ये विशेषत: धरणालगतच्या रिसॉर्टमध्ये तंबू ठोकून पार्टी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये प्रतिव्यक्ती दोन ते चार हजार रुपये आकारण्यात येत असल्याचे नॉर्मन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या