Pune News – आधी मुलीच्या नावे इन्स्टाग्रामवर चॅटिंग, मग भेटायला बोलावून जीवघेणा हल्ला

पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. हडपसरमधील हत्येची घटना ताजी असतानाच सिंहगड रोडवर आणखी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सागर चव्हाण असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे.

आरोपींनी आधी इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावे फेक अकाऊंट बनवून सागरशी मैत्री केली. त्यानंतर महिनाभर मुलीच्या नावे सागरशी चॅटिंग केली. मग बुधवारी सकाळी सागरला भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे सिंहगड रोडवरील किरकटवाडी फाटा येथे सागर मैत्रिणीला भेटायला गेला असता आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील डहाणूकर कॉलनीमध्ये एकमेकांकडे बघितल्याच्या कारणातून मे महिन्यात सागर आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. यावेळी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. सागरचाही या हत्येत सहभाग असल्याने आरोपींनी त्याचा काटा काढण्यासाठी सागरला फसवून घटनास्थळी बोलावले आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.