संततधार पावसामुळे एकीकडे शहर आजारी पडले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी खांदेपालट केली असली तरी काही सहायक आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांची खुर्ची सुटत नाहीत. त्यांच्याकडे असलेला भार सोडायचा नाही म्हणून काहीजण मेडिकल सुट्टीवर गेले असून, जाताना काहींनी सोबत फायली नेल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या खांदेपालट आदेशाला सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘खो’ घातला आहे.
महापालिका आयुक्त भोसले यांनी केलेल्या खांदेपालटामुळे सहायक आरोग्य अधिकाऱ्यांची निर्माण झालेली एकाधिकारशाही ही मोडित निघणार होती. आयुक्त भोसले यांनी काढलेल्या आदेशाला सहायक आरोग्य अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्याची तयारी सुरू झाली आहे. आरोग्य अधिकारी रजेवर आणि आजारपणाचे कारण काढून आपल्याकडील विभागाचा चार्ज दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यास चालढकल करू लागले आहेत. तर, आज सुनावणी असलेल्या फायली एका सहायक अधिकाऱ्याने घरी नेल्याचे समोर आले आहे. शहरात साथीचे आजार वाढले असताना आरोग्य विभागात मात्र ‘क्रीम पोस्ट’साठी राजकारण सुरू आहे.
वावरे यांच्याकडे तेच विभाग
सहायक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक यांनी थेट आयुक्तांना तीन पानी पत्र लिहिले आहे. त्यांनी संबंधित विभागात केलेल्या कामाची माहिती देत आपण या विभागात चांगले काम केले असून, हेच विभाग माझ्याकडे कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तर, सहायक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांच्याकडील कोणताच विभाग काढला गेला नाही, असा आरोप या सहायक आरोग्य अधिकाऱ्याने केला आहे.
महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर चार्ज सोडणे दुसऱ्याने घेणे असे काही नसते. चार्ज काढला की दुसऱ्याकडे जातो. चार्ज सोडला नाहीतरी एकतर्फी चार्ज काढून घेता येतो. चार्ज न सोडल्यास कारवाई करू. कोणी फाईल घरी नेल्या असल्यास त्याची तपासणी
केली जाईल. – डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त, पुणे.