पुणेकरांनो… वाहने सांभाळा; शहरात दिवसात सहा दुचाकी चोरीचे गुन्हे

शहरात गुन्हेगारीबरोबरच सराईत वाहनचोरदेखील सुसाट सुटले असून, काल एका दिवसात पुणे पोलिसांत वाहनचोरीचे सहा गुन्हे दाखल झाले आहेत. येरवडा, चंदननगर, वानवडी, हडपसर, भारती विद्यापीठसह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून वाहने चोरीला गेली आहेत. शहर परिसरातील सार्वजनिक रस्ते असो, वा खासगी पार्किंग सर्वच ठिकाणी वाहनचोर सक्रिय आहेत.

वाहनचोरीविरोधी पथकाचे काम दिसेना

वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांची शहरातील दोन भागात विभागणी करून कामाचे वाटप करण्यात आले. पण, या पथकांना वाहन चोरींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात म्हणावे तसे यश येताना दिसून येत नाही. वाहनचोरी विरोधी पथके ही फक्त नावालाच आहेत की काय, असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस लक्ष देत असून, गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे; मात्र दुसरीकडे शहरात सराईत वाहनचोरांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. घराजवळ, सोसायटीच्या किंवा कार्यालयाच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या गाड्या चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.

त्यामुळे खऱ्या अर्थाने वाहनचोऱ्या रोखण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. रुबी हॉल मेट्रो पार्किंगमधून दुचाकी चोरी गेल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीप मुनोत (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. मुनोत यांनी रुबी हॉल मेट्रो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली होती. ते परत आल्यानंतर त्यांची गाडी जागेवर दिसली नाही.

कात्रज घाट परिसरातील पोलीस मदत केंद्राजवळील कॉर्नरवरून दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली. याप्रकरणी अमोल मंडलिक (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गुरुवारी रात्री येथून जात असताना लघुशंकेसाठी थांबले.

दहा मिनिटांनी ते परत गाडीजवळ आले असता दुचाकी चोरी झाल्याचे समजले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत, तर शास्त्रीनगर येथील आय.बी.एम. टेकपार्क येथे पार्क केलेली गाडी चोरी गेल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नीरज शिंदे (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांनी टेकपार्क भागात स्कुटी पार्क केली होती. मात्र, काही वेळानंतर त्यांना तेथे स्कुटी मिळून आली नाही. जुना मुंढवा रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. याबाबत बाळासाहेब जुबडे (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार चंदननगर पोलीस तपास करीत आहेत, तर घराजवळील मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी चोरी गेल्याचा प्रकार हडपसरमधील साईनाथ वसाहत येथे घडला. याबाबत सोहेल नुरे (वय 21) यांनी फिर्याद दिली आहे. वानवडीतील केदारी गार्डन भागातदेखील दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली असून, वानवडी पोलीस तपास करीत आहेत.

महागडी वाहने चोरीला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेकांनी कर्ज काढून वाहन खरेदी केलेले असते. चोरीनंतरही बँकांना वाहनकर्जाचे हप्ते भरावेच लागतात. त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. अनेकदा वाहन चोरटे हे परप्रांतीय असल्याचे विविध गुन्हांतून उघडकीस आले आहे. हे चोरटे शहरातून चोरलेले वाहन आपल्या राज्यात नेऊन तेथे त्यांची विक्री करतात. त्यामुळे चोरीला गेलेले वाहन अनेकदा हाती लागतच नाही. पोलिसांनाही याचा शोध घेणे जिकीरीचे होऊन जाते. त्यामुळे पोलीसही आलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येते.

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी

शहर परिसरातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र, त्या तुलनेत पोलिसांना चोरीला गेलेल्या वाहनांचा छडा लावण्यात यश येत नाही. गेल्या काही दिवसांत पोलिसांना वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणून चमकदार कामगिरी दाखविता आलेली नाही. त्यामुळे गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण ढेपाळलेलेच आहे.