पुणे : तीन महिलांना ऑनलाईन गंडा, ऑनलाईन फसवणूकीचे सत्र कायम

584

शहरात ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम असून सीमकार्ड, पेटीएम अ‍ॅप अद्यावयत करण्याच्या बतावणीसह बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांकडून नागरिकांना गंडा घातला जात आहे. वेगवेगळ्या तीन फसवणूकीच्या घटनांमध्ये  महिलांची 3 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने वानवडीतील एका  महिलेला 1 लाख 19 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला.  सीमकार्ड अपग्रेड न केल्यास तुमची मोबाइल सेवा बंद पडेल, अशी बतावणी सायबर चोरट्याने महिलेला केली. त्यामुळे महिलेने त्याला बँक खात्याची माहिती दिली.  त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेच्या बँक खात्यातून 1 लाख 19 हजार रुपये ऑनलाईनरित्या काढून घेतले. बँकखात्यातून पैसे कमी झाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील तपास करत आहेत.

पेटीएम अ‍ॅप अद्यावयत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने औंध येथील महिलेला 84 हजार 313 रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी महिलेने चतु:शृंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सायबर चोरट्याने तक्रारदार महिलेला काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. त्यामध्ये तुमच्या पेटीएम अ‍ॅपची मुदत संपत आली आहे. पेटीएम अपग्रेड न केल्यास बंद पडेल अशी बतावणी केली. त्यानुसार महिलेने संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्याने  महिलेला क्विक सपोर्ट अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 84 हजार 313 रुपये ऑनलाईनरित्या लांबविण्यात आले.

बँक अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या खात्याची माहिती घेउन ऑनलाईनरित्या 95 हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत. याप्रकरणी एका 74 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने तक्रारदार महिलेला  बँक खात्यातील माहिती अद्यावयत करण्याचे काम सुरू आहे. माहिती न दिल्यास बँकखाते बंद पडेल अशी बतावणी केली होती. त्यानुसार   बँक खात्यासह डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेउन सायबर चोरट्याने महिलेला 95 हजार रुपयांचा गंडा घातला.

आमिषांवर विश्वास ठेउ नका

सायबर चोरट्यांकडून नागरिकांना वेगवेगळी आमिष दाखविले जात आहे. मोबाइल सेवा देणारी कंपनी, बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी, पेटीएम अपग्रेड करण्याच्या बतावणीने गंडा घातला जात आहे. नागरिकांनी  बतावणीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

सायबर चोरटे नागरिकांकडून बँकखात्याची गोपनीय माहिती घेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक केली जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमिष किंवा बतावणीचे फोन आल्यास सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी.
-संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, सायबर विभाग

आपली प्रतिक्रिया द्या