पुण्यात पीएफआय संघटनेविरुद्ध गुन्हा दाखल, देशविघातक कारवाईचा कट रचल्याचा आरोप

दहशतवाद्यांना पैसे पुरवीत असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआय संघटनेने परवानगी नसतानाही आंदोलन केले. त्यावेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्या प्रकरणी आता बंडगार्डन पोलिसांनी संघटनेविरुद्ध देशविघातक कारवायांसाठी कट रचल्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार गुह्यातील कलमांमध्ये भारतीय दंड विधान 153अ, 124, 109 आणि 120 अ आणि ब नुसार वाढ केली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईमुळे पीएफआयने 23 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केले. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणे आणि देशाच्या विविध भागांतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न संघटनेने केल्याचा आरोप होत आहे. त्याशिवाय ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानुसार याप्रकरणी आता देशविघातक कारवायासाठी कट रचल्या प्रकरणी पोलिसांनी पीएफआय संघटनेविरुद्ध दाखल गुह्यात कलमांची वाढ केली आहे. त्याशिवाय व्हिडीओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे व्हिडीओ देण्यात आला आहे.

पीएफआयवर बंदीचा केंद्र सरकार करेल – देवेंद्र फडणवीस

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियानिर्णय  म्हणजेच पीएफआय संघटनेबद्दल गेली काही वर्षे केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहे. अनेक पुरावे त्यांनी गोळा केले आहेत. केरळ राज्य सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. राज्य सरकार याकडे लक्ष ठेवून असून बंदीसंदर्भात पेंद्र सरकार निर्णय करेल, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘याप्रकरणी आपण पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अशा घोषणा देणाऱयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, असे आदेश दिले आहेत. या संदर्भात दोन व्हिडीओ आहेत, त्याचा तपास केला जाईल.