महापालिका कर्मचारी ‘तिच्या’साठी ठरले देवदूत!

546

ती नऊ महिन्यांची गरोदर. प्रसव वेदना होऊ लागल्या. तिला रुग्णालयात न्यायचे होते. पतीने रिक्षावाल्याला विनंती केली. रिक्षा रुग्णालयाकडे निघाली. पण, पेट्रोल संपले. सायंकाळची वेळ. निर्मनुष्य रस्ता. कोणीही मदतीला नाही. पण, महापालिका कर्मचाऱ्यांच्या रुपाने देवदूत धावून आले. त्यांच्या वाहनातून त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले आणि तिच्यावर वेळेत उपचार सुरू झाले.

पिंपरी – चिंचवड महापालिका विद्युत विभागाचे पथदिवे निगराणी पथक चिखली प्राधिकरण परिसरातून शुक्रवारी संध्याकाळी जात होते. स्पाईन रस्त्यावरील जाधववाडी चौकालगत एक रिक्षा उभी होती. तिच्या चालकासह एक कुटुंब उभे होते. पती, पत्नी, दोन मुले. ती स्त्री गरोदर होती. तिला प्रसव वेदना होत होत्या. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे ते निघाले होते. पण, रिक्षातील पेट्रोल संपले होते. त्यामुळे त्यांना मध्येच थांबावे लागले.

लॉकडाऊनमुळे दुसरे वाहनही रस्त्यावर दिसत नव्हते. पती हतबल. रिक्षावाल्याचा नाईलाज होता. महिलेच्या वेदना वाढतच होत्या. अशा स्थितीत एक आशेचा किरण दिसला. समोरून एक जीप येताना दिसली. त्यात महापालिका विद्युत विभागाचे पथदिवे निगराणी पथक होते. त्यात वायरमन अंकुश लांडगे, जीपचालक रामदास गवारी आणि मदतनीस विलास माने असे तिघेजण होते. त्यांनी परिस्थितीचे भान ठेवून निर्णय घेतला. महिलेसह तिचा पती आणि दोन्ही मुलांना घेऊन डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय गाठले आणि महिलेवर उपचार सुरू झाले. महापालिका कर्मचारी त्या कुटुंबासाठी देवदूत ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या