पुण्यात लोनअ‍ॅपचे प्रतिनिधी पोलीस आयुक्तांच्या रडारवर, तक्रारींच्या निराकरणासाठी स्वतंत्र पथक कार्यरत

कर्जदारांना धमकाविणे, सोशल मीडियावर बदनामी करणे, शिवीगाळ करणे, बदनामीकारक मेसेज व्हायरल करणाऱ्या लोनअ‍ॅप प्रतिनिधींविरूद्ध पोलिसांनी दंड थोपाटले आहेत. अशाप्रकारे पिळवणूक करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वंतत्र तपास पथकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

लोन अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या नागरिकांना धमकावणे तसेच त्यांना शिवीगाळ करण्याचे प्रकार वर्षभरापासून वाढीस लागले आहेत. लोनअ‍ॅप प्रतिनिधींच्या धमकीमुळे तरुणाने नुकतीच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संबंधित अ‍ॅपवर पोलिस कारवाई करणार का?, असा प्रश्न विचारला जात होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लोनअ‍ॅप प्रतिनिंधीविरुद्ध कठोर भूमिका घेत, कारवाईचा इशारा दिला आहे. त्यासाठी सायबर पोलीस ठाण्यातंर्गत स्वतंत्र पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याद्वारे कर्जाची परतफेड किंवा हप्ते थकल्यास सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल करणे, शिवीगाळ करून धमकावणाऱ्याची माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे.

स्वतंत्र पथकाकडून असा होणार तपास

लोनअ‍ॅपच्या आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये. त्यांच्याविरोधात आवाज उठविण्यासाठी नागरिकांनी न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लोनअ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक, धमक्या वाढल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सायबर गुन्हे शाखेत स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. पथकाकडून अशा अ‍ॅप प्रतिनिधींची माहिती काढली जात आहे. त्यानुसार त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

लोनअ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना धमकाविणाऱ्याविरूद्ध कारवाईचा प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार स्वतंत्र पथकाकडून तपास करून बडगा उगारण्यात आला आहे. नागरिकांनी लोनअ‍ॅपच्या आमिषांना बळी पडू नये, त्याशिवाय अशा प्रकरणांत धमकी, शिवीगाळ, बदनामी होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर