पुण्यात घरफोड्या करणाऱ्या सराईत बंटी-बबलीला अटक, पाच गुन्हे उघडकीस

804

घराची साफसफाई करण्याचे साहित्य विक्रीच्या बहाण्याने फिरून रेकी करत घरफोड्या करणाऱ्या सराईत बंटी बबलीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत 45 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

रामा पापा जाधव उर्फ रामा सोनाजी कांबळे (वय – 25, रा. शिवाजीनगर) आणि उषा रामा कांबळे (वय- 28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दुचाकी, कटावणी, एक स्क्रू ड्रायव्हर असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांनी लष्कर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क, कामशेत टाकवे याठिकाणी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

कॅम्प परिसरात रामा व उषा हे सराईत घरफोडी करणारे थांबल्याची माहिती गुन्हे शाखेचे कर्मचारी गजानन सोनुने यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात 26 पेक्षा जास्त घरफोड्या केल्याचे उघडकीस आले.

दोघेही बंटी व बबली नावाने प्रसिद्ध असून घर साफसफाई करण्यासाठी लागणारे झाडू, ब्रश असे साहित्य घेऊन विविध सोसायट्यामध्ये फिरत रेकी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्या सोसायट्यांमध्ये फ्लॅट बंद आहेत, त्याची रेकी करून घरफोडया करत होते. ही कामगिरी पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, विजेसिंग वसावे, अरविंद चव्हाण, गजानन सोनुने, उमेश काटे, सुभाष पिंगळे, अशोक माने, तुषार माळवदकर, पूजा करंजावणे, वैशाली कौरव यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या