घरफोडीचे व्यसन लागलेल्या चोराला अटक, २०० घरफोड्या उघड

सामना प्रतिनिधी । पुणे

पनवेलवरून पुण्यात यायचे. महागड्या लॉजमध्ये मुक्काम ठोकायचा, चार-पाच दिवस रेकी करून फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास करायचा. हायफाय लाईफ स्टाईलने राहणाऱ्या एका ६० वर्षाच्या चोरट्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याने आतापर्यंत जवळपास २०० पेक्षा जास्त घरफोड्या केल्या असून, दोन वेळा शिक्षाही भोगली आहे.

रवी गोपळा शेट्टी (वय ६०, रा. काळुंद्रेगाव, पनवेल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रवी शेट्टीला पत्नी आणि एक मुलगा आहे. परंतू, त्याची पत्नी त्याच्यासोबत राहात नाही. शेट्टीला घरफोडी प्रकरणात १९८८ मध्ये पहिल्यांदा अटक झाली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून ८८ गुन्हे उघडकीस आणले होते. त्याला अटक केल्यानंतर तो तीन वर्ष शिक्षा भोगून बाहेर आला. त्यानंतर पुन्हा घरफोड्या सुरू केल्या. २००७ मध्ये त्याला पुन्हा अटक केली, त्यावेळी त्याच्याकडून ११२ घरफोड्या मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्या. २००७ ते २०१४ या काळात शिक्षा भोगून तो बाहेर आला.

२०१४ पासून त्याने हडपसर, विमानतळ, दिघी, लोणीकंद, भारती विद्यापीठ, खडकी, देहूरोड या पोलीस ठाण्यांमध्ये ९ घरफोड्या केल्या. याप्रकरणी त्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १८ लाख रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात तो गेल्या एका महिन्यापासून पुण्यात एका लॉजमध्ये थांबला होता. त्या ठिकाणी त्याने सव्वा लाख रूपये भाडे भरले आहे. उच्च प्रतिचे आयुष्य जगतो, असे परिमंडळ चारचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले. वरिष्ठ निरीक्षक संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेट्टी हा अटक झाल्यानंतर पुन्हा जामीनासाठी अर्ज करत नाही. स्वत:च खटला लढतो, शिक्षा झाल्यानंतर ती पूर्ण भोगून बाहेर येतो. त्यानंतर पुन्हा घरफोड्या करतो. शेट्टीने चोरलेले दागिने स्वत: घरामध्ये वितळवत असत. त्याचा गोफ तयार करून तो सराफांना विकत असे, असेही तपासामध्ये समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या