तरूणीला दिले सिगारेटचे चटके, १२ अटकेत

41
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । पुणे

वेश्या व्यवसायासाठी १५ वर्षाच्या बांग्लादेशी मुलीला पुण्यातील दलालाने ८० हजार रूपयांना विकत घेतले. मुलीने विरोध करताच शरीरावर सिगारेटचे चटके देऊन, मारहाण करून तिचे अमानुष हाल करण्यात आले. हा प्रकार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला कळल्यानंतर कात्रज येथील एका अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या खोलीतून तिची सुटका करण्यात आली. या कारवाईत इतर चार तरूणींची सुटका करून १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

बालाजीनगर येथील एम.एम. ग्रुप लॉजिंगचा चालक नुतन उर्फ रुपेश हरकचंद मुनोत (४२), व्यवस्थापक मुन्ना उर्फ लक्ष्मण विजय आहेर या दोघांसह १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

बालाजीनगर येथील एन.एम. ग्रुप लॉजिंगमध्ये काही तरूणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. त्यात एका बांग्लादेशी अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याची माहिती रेस्क्यू फाऊंडेशन या संस्थेने सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी लॉजवर छापा टाकला. तेथे तीन तरूणी सापडल्या, त्यात एक अल्पवयीन होती. पण बांग्लादेशी मुलगी गायब असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी माहिती काढली असता, ती कात्रज-सातारा रस्त्यावर इंडियन पेट्रोलपंपाच्या मागे एका अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या खोलीत बंदीस्त असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे छापा टाकताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या अल्पवयीन तरूणीची सुटका केली. त्यावेळी ती प्रचंड भेदरलेली होती. तिच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचे दिसले. तिला नोकरी देण्याच्या अमिषाने पुण्यात आणून वेशाव्यवसायत ढकलण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर आत्याचार सुरू होते, असे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

सहायक आयुक्त सुरेश भोसले, अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक संपत पवार, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, कर्मचारी तुषार आल्हाट, प्रदीप शेलार, प्रमोद म्हेत्रे, रमेश लोहकरे, संजय गिरमे, राजेश उंबरे, नितीन लोंढे, संदीप गायकवाड, सचिन शिंदे, महिला कर्मचारी जयश्री जाधव, दमयंती जगदाळे, ननिता येळे, गितांजली जाधव, रुपाली चांदगुडे, सरस्वती कांगणे यांनी ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या