बेशिस्तांनो आता तुमची खैर नाही, पुण पोलीस आयुक्तांचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नागरिकांकडून नियम पालन करून सहकार्य केले जात आहे. मात्र, विविध भागात काही बेशिस्तांकडून विनाकारण भटकंती केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही नागरीक रस्त्यांवर फिरणे थांबवित नाही. त्यामुळे आता कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय बेशिस्त फिरत असल्यास संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाईबरोबरच पोलिसांकडून योग्य ‘पाहूणचार’ केला जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने विकेंड लॉकडाऊनसह रात्रीप्रमाणेच दिवसा संचारबंदी अशी उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, दररोज सायंकाळी सहानंतर रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊनलाही काही नागरीक घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही कारणाशिवाय कोणी फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडवणूक होऊ नये, यादृष्टीने पोलिसांकडून सहकार्याची भूमिका घेतली जात आहे. त्याचा काही बेशिस्तांकडून गैरफायदा घेतला जात आहे.

संचारबंदीत अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारणांशिवाय नागरीकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. असे असतानाही अनेकजण विनाकारण फिरत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना फिरताना बेशिस्त नागरिक दिसून आले आहेत. त्यामुळेच यापुढे कोणत्याही सबळ कारणाशिवाय नागरिकांना फिरता येणार नाही.

अन्यथा संबंधितांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, विनाकारण भटंकतीमुळे संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संबंधित फिरणाऱ्या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाईसह कडक कारवाई करण्याच्या इशारा पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या