टेक्नोसॅव्ही हवालदाराचे डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले कौतुक

पुणे शहरातील वाहतूक समस्येवर पुणेकरांच्या ट्विटला तातडीने उत्तरे दिल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नागरिकांची वाहवा मिळविली. मात्र, या यशात आपल्या टिममधील एका टेक्नोसॅव्ही हवालदाराचा मोठा वाटा असल्याचे डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगत या कर्मचाऱ्याचा गुणगौरव केला आहे. वाहतूक विभागातील हवालदार प्रवीण घाडगे असे टेक्नोसॅव्ही हवालदाराचे नाव आहे.

नागरिकांनी पुणे पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर वाहतूकीसंदर्भात केलेल्या ट्विटची दखल घेत संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत होता. त्यामध्ये विना हेल्मेट प्रवाशांचा फोटो, खड्डेयुक्त रस्ता, बिघाडलेला सिग्नल, नो पार्किंगमधील वाहने, झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेल्या वाहनचालकांचा समावेश होता. त्यांचे फोटो मिळताच दंडात्मक कारवाई करुन बेशिस्तांना मोबाईलवर मेसेज पाठविले जात होते. शहरातील विविध भागातील नागरिकांकडून पुणे सिटी ट्रॅफिक ट्विटर हँडलवर आलेल्या तक्रारींचा तातडीन निपटरा केला जात होता. त्यानंतर त्याचा दररोजचा अहवाल पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे पाठविण्यात येत होता. त्यासाठी पोलीस हवालदार प्रवीण घाडगे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.

सीसीटीव्ही आणि नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींमुळे कारवाई होत असल्यामुळे प्रवाशांकडून वाहतूक नियमनाला प्राधान्य देण्यात आले. वाहतूकीसंदर्भात ऑनलाईन तक्रारींची सोडवणूक करुन नागरिकांना प्रतिसाद देण्याचा घाडगे यांचा हातखंडा आयुक्तांना आवडला होता. त्यामुळे इतर टेक्नोसॅव्ही मदतीसाठी ते प्रवीण घाडगे यांना बोलवत होते. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घाडगे यांच्या नावाचा उल्लेख करीत त्यांचे कौतुक केले.

sketchथँक्यू लेडी कॉन्स्टेबल दीपाली तांदळे!
पोलीस नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या कॉन्स्टेबल दीपाली तांदळे यांनी आयुक्तांचे पेन्सिलने चित्र काढले होते. हे चित्र त्यांनी ट्विटरवर अपलोड करीत, सर तुमच्या मार्गदर्शनाखाली ड्युटी करताना खूप काही शिकायला मिळाल्याचे म्हटले होते. त्यास डॉ. के. व्यंकटेशम यांनी थँक्यू दीपाली असे म्हणत त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या