मॅडम माझ्याशी लग्न कराल का… पोलीस नियंत्रण कक्षात प्रपोजचे कॉल

3042

>> नवनाथ शिंदे

पुणे-हॅलो…नमस्कार पोलिस नियंत्रण कक्ष…अहो मॅडम कोरोना किती दिवस आहे ओ…माहिती नाही सर… आपल्याला काय मदत हवी आहे ते सांगा…काही नाही मॅडम, लग्न करायचं आहे माझं… सर तुम्हाला कोणती मदत पाहिजे आहे…मॅडम तुमचं लग्न झालयं का ओ… तुम्ही छान बोलता… मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. अशारितीने लॉकडाउनमध्येही पुणे पोलीस नियंत्रण कक्षात वेगवेगळ्या फोनकॉल्समुळे महिला कर्मचाऱ्यांची सध्या चांगलीच करमणूक होत आहे.

लॉकडाउन कालावधीत शहरातील नागरिकांना तातडीची मदत करण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, काहीजणांकडून अनपेक्षित मागणीचा फोनकॉल करुन महिला कर्मचाऱ्यांना थेट लग्नासाठी प्रपोज केले जात आहे. त्यामुळे महिला कर्मचारीही आश्चर्यचकित होत आहेत. सर आपणाला काय मदत हवी आहे का, नाहीतर आपला फोन डिसकनेंक्ट केला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र, फोनकत्र्यांकडून अहो, मॅडम तीन महिन्यांपूर्वी माझे लग्न जमणार होते. पण आता, कोरोनाचा कहर एवढा वाढलाय की पोरगी कोण देत नाय, काय करावं सुचत नाही, तुम्ही लग्न करता का माझ्याशी, अशा प्रश्नांमुळे महिला कर्मचारी बुचळ्यात पडत आहेत. संबंधित फोनकॉलशी माहिती महिलांनी एकमेकींना दिल्यानंतर नियंत्रण कक्षात हास्यकल्लोळ उडत आहे. त्यानंतर संबंधित क्रमांकावरुन वारंवार फोन आल्यास कारवाईची तंबी दिली जात आहे. लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून अनेकजण घरामध्ये बसून आहेत. त्यामुळे पोलिसांची फिरकी घेण्यासाठी काही जणांकडून चक्क लग्नाच्या प्रप्रोजसाठी फोन केले जात आहेत.

पोलीस नियंत्रण कक्षात दोन शिफ्टमध्ये काम सुरु असून प्रत्येकी 25 महिला कर्मचारी आणि अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. लॉकडाउन कालावधीत पुणेकरांकडून नियंत्रण कक्षात फोन करून वैयक्तिक अडचणींचा पाढाच वाचला जात आहे. त्यामुळे तक्रारकत्र्याला नेमके काय उत्तर द्यावे याचा पेच कर्मचाऱ्यांना पडत आहे. लॉकडाउननंतर पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या काही फोनकॉलमुळे कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांकडून जेवण करीत असताना एका हातात घास आणि दुसऱ्या रिसीव्हर उचलून फोनकॉलला प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण पोलीस नियंत्रण कक्षाला फोन वेळ वाया घालवू नये असे, आवाहन करण्यात आले आहे.

फोन करून पुणेकरांकडून अशी टाकले जातेय गुगली

-टीव्ही खराब झालाय, कोठे दुरुस्त होईल
– हॉटेल बुक करायचे आहे, काय करू
-दिवसभरात शहरात कितीजणांना कोरोना झाला आहे
-माझ लग्न जमलंय पण, प्रवास करता येईल का
-पोरगी पाहायला गेले तर चालेल का
-थोडीच दारु प्यायलो होतो, बायकोने मारले आहे
-स्वस्त भाजी कुठे मिळते
-फोनचे रिचार्ज केले तरी रिंगटोन वाजतच नाही

आपली प्रतिक्रिया द्या