पुणे पोलीस मुख्यालयातच महिला कर्मचाऱ्यांची हाणामारी

शिवाजीनगरमधील पोलीस मुख्यालयात दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील फ्री स्टाईल मारामारीनंतर पोलिस मुख्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ड्युटी ऑफिसर मदतनीस असलेल्या पोलीस शिपाई महिलेने थेट पोलीस नाईक महिलेला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मारहाणीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हाणामारीत जखमी झालेल्या पोलिस नाईक महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालयात सोमवारी सकाळी संबंधित पोलीस नाईक महिला ड्युटी ऑफिसर असलेल्या मदतीस महिला शिपायाकडे गेली होती. ड्युटीसंदर्भात दोघींमध्ये शाब्दिक वादावादीतून शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे प्रकरण थेट हातघाईवर आले. त्यामध्ये ड्युटी ऑफिसर मदतनीस असलेल्या महिला पोलीस शिपायाने नाईक पदावर कार्यरत असलेल्या महिलेवर हात उचलला. आरडा-ओरड, शिवीगाळ होत असल्यामुळे परिसरात कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. मारहाणीत पोलिस नाईक जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भांडणाला आर्थिंक कारणाचा वास

पोलिस मुख्यालयात ड्युटी ऑफिसर मदतीस असलेल्या महिला पोलिस शिपायांकडून विविध कामांसाठी आर्थिंक तोडपाणी होत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्या देवाण-घेवाणीतून मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

”महिलांमध्ये झालेल्या मारहाणीची खात्यातंर्गत चौकशी करुन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही.” – मीतेश घट्टे, पोलीस उपायुक्त, प्रभारी मुख्यालय प्रमुख

आपली प्रतिक्रिया द्या