पोलीस स्मृतीदिनानिमित्त विभागीय आयुक्तांकडून मानवंदना

पोलीस स्मृतीदिनानिमित्त आज विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते पाषाण रोडवरील राज्य पोलीस संशोधन केंद्रात वीरमरण प्राप्त पोलीस बांधवांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुळकर्णी, बिनतारी संदेश विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पोलीस स्मृतीदिनानिमित्त शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील प्रत्येकी एक प्लाटुनमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी व सेकंड कमांडर पोलीस निरीक्षक रामकृष्ण गोटमवाड यांनी कवायतीचे नेतृत्व केले.

यावेळी 1 सप्टेंबर 2019 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत कर्तव्य बजाविताना वीरमरण प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी आणि जवान मिळून 264 जणांच्या नावाच्या यादीचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमासाठी पुणे शहर आयुक्तालय, पुणे ग्रामीण, बिनतारी संदेश विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे मोटार परिवहन विभागातील 95 वरिष्ठ पोलीस अधिकारी व 115 कर्मचारी हजर होते.

आपली प्रतिक्रिया द्या