3 लाखांचे दागिने रिक्षात पडले, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी घेतला शोध

2751

एरव्ही लॉकर किंवा बँकांमध्ये ठेवण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने दिवाळीच्या दिवसात महिला हमखास वापरतात. मात्र याच काळात दागिने हरवण्याचे, चोरीला जाण्याचे प्रकारही घडतात. असाच एक प्रकार पुण्यात एका जोडप्या सोबत घडला. या जोडप्याची तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग हरवली होती. मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तातडीने हालचाली करत काही तासांतच दागिने परत मिळवून दिल्याने या जो़डप्याचा जीव भांड्यात पडला.

जागृती रवींद्र येदली या आपले पती रवींद्र येदली यांच्या सोबत सोमवारी मुंबईहून पुण्याला पोहोचल्या. त्यावेळी सकाळचे 11:30 वाजले होते. त्यानंतर ते दोघे पुण्यातील सेलिस्बरी पार्क येथील आपल्या घरी गेले. मात्र घरात पोहोचल्यावर आपल्यासोबत आणलेली दागिन्यांची बॅग दिसत नाही हे लक्षात आल्यावर त्यांची चिंता वाढली. त्यांनी सारं घर, परिसर तपासलं अखेर बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी त्यांना बॅग शोधून देऊ असे आश्वासन दिले. जोडप्याने दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू झाला. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या नेतृत्वात चार जणांचे पथक पथक नेमले. सर्व ठिकाणांवर जाऊन तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जगदाडे आणि दोन कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरचे जवळपास 12 सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 6 ऑटो रिक्षांना ट्रेस करण्यात आले. त्यांची संपूर्ण माहिती घेण्यात आली, त्यांच्या मालकांची माहिती गोळा करण्यात आली.

couple-with-jewelry-bag

यातील एका रिक्षा मालकाची ओळख जोडप्याने दिलेल्या माहितीशी जुळणारी होती. त्याला संपर्क करण्यात आला. सिकंद अब्दुल शेख असे या रिक्षा मालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आणि येदली जोडप्यालाही तसा निरोप धाडला. पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर शेख यांना आपल्या रिक्षाच्या मागच्या भागात एका बॅग पडली असल्याचे कळले. त्यांनी ती बॅग काढून पोलिसांनी सुपूर्द केली. दागिने आणि बॅगेची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या प्रक्रियेनुसार जोडप्याला ती दागिन्यांनी भरलेली बॅग देण्यात आली. तेव्हा कुठे जोडप्याच्या जीवात जीव आला. त्यांनी बक्षिस म्हणून रिक्षा चालकाला 500 रुपये दिले.

आपली प्रतिक्रिया द्या