Pune News : पोलिसांचा मोठा निर्णय, दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स होणार रद्द

पोर्शे कार अपघातानंतर पुणे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. आता दारु पिऊन गाडी चालवल्यास चालकाचे थेट लायसन्सच रद्द करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेत मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमावलीनुसार एखादा व्यक्ती पहिल्यांदा दारु पिऊन गाडी चालवताना आढळल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द होईल. दुसऱ्यांदा आढळल्यास सहा महिन्यांसाठी परवाना रद्द होईल. तिसऱ्यांदा दारु पिऊन आढळल्यास कायमस्वरुपी परवाना रद्द करण्यात येईल. पुणे पोलीस आयुक्त रोहिदास पवार यांनी ही माहिती दिली.

पुण्यात सतत घडणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना पाहता नागरिकांना रस्त्याने चालायलाही भीती वाटू लागली आहे. आरोपींना कायद्याचा धाक उरला नसल्याचे अशा घटनांवरून दिसून येते. पोर्शे कार अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच महिला पोलिसाला पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. यामुळे वाढती गुन्हेगारी आणि अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पुणे सज्ज झाले आहे.