स्वप्नीलला कांस्य अन् रेल्वेच्या पुणे विभागाचा जल्लोष

ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून पॅरिसमध्ये हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकविणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे हा मध्य रेल्वेमध्ये पुणे विभागात टीसी म्हणून कार्यरत आहे. आपल्या कर्मचारी खेळाडूने सातासमुद्रापार केलेल्या या पराक्रमामुळे रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांनी मोठा जल्लोष केला. आपल्या सर्व कर्मचाऱयांना पेढे भरवून त्यांचे तोंड गोड केले.

‘आमच्यासाठी आणि देशासाठी ही आनंदाची बाब आहे. ऑलिम्पिकमधील पहिले पदक मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील खेळाडूने मिळवल्याने विशेष आनंद झालाय. रेल्वेकडून खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन, सुविधा दिली जाते. स्वप्नीलच्या यशाने इतर खेळाडूंना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.’ , अशी प्रतिक्रिया पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिली.

‘स्वप्नीलच्या यशाने रेल्वे विभागच नाही, तर साऱया हिंदुस्थानात जल्लोष, आनंद आहे. रेल्वेकडून मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. आम्हाला आता त्याच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. स्वप्नील हा पुणे रेल्वे विभागातील कर्मचारी असल्याचा आम्हाला कायम आनंद आहे, असे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे उपव्यवस्थापक बी. के. सिंग यांनी सांगितले.

‘हिंदुस्थान रेल्वेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ही ऐतिहासिक कामगिरी स्वप्नीलकडून झाली आहे. रेल्वेकडून खेळाडूंना सुविधा दिली जाते. स्वप्नीलने या सुविधांचं सोनं केलं.’, असे वरिष्ठ विभागीय क्रीडा अधिकारी जितेंद्र प्रताप सिंग म्हणाले.

स्वप्नील हा पुणे विभागाचा खेळाडू असल्याने आम्हाला आनंद होत आहे. पुणे रेल्वे विभाग त्याच्या आनंदामध्ये सहभागी आहे. रेल्वेकडून खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन मिळालेले आहे. यापुढेही मिळत राहील. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्याने विशेष आनंद आहे, पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे यांनी सांगितले.