विकृत जातीयवाद्यांनी मध्यरात्री कुर्‍हाडी, हातोड्याचे घाव घालत राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला

59

‘मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा’चा त्रिखंडात गजर करणार्‍या महाकवी गोविंदाग्रजांची घोर विटंबना
पुरोगामी महाराष्ट्राला कलंक; तमाम जनतेत संतापाची लाट

पुणे– महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणार्‍या पुण्यात पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना घडली. ‘मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा… प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’ या काव्यातून भगवा जरीपटका ल्यायलेल्या शूरवीरांच्या महाराष्ट्राचा त्रिखंडात जयजयकार करणारे कवी आणि महान नाटककार शब्दप्रभू राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांच्या पुतळ्याची विकृत जातीयवाद्यांनी घोर विटंबना केली. शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला गडकरी यांचा पुतळा जात्यंधांनी मध्यरात्री लपत छपत येऊन हातोडी, कुर्‍हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून गडकरी यांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले.

‘मंगल देशा पवित्र देशा…, राजहंस माझा निजला…, गुलाबी कोडे अशा सुमारे दीडशे कवितांचा वाग्वैजयंती हा काव्यसंग्रह, बाळकराम या टोपण नावाने असंख्य विनोदी लेख आणि एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही तीन पूर्ण नाटके तर राजसंन्यास आणि वेड्यांचा बाजार ही अपुरी राहिलेली नाटके असे मराठीतील अलौकिक प्रतिभेचे देणे राम गणेश गडकरी यांनी साहित्य शारदेच्या दरबारात अर्पण केले. ‘गुणी बाळ असा जागसी का रे वाया…’ हे शिवरायांना जोजवणारे अंगाईगीत लिहिणारे गडकरी हे मराठीतील शेक्सपियर म्हणून ओळखले जात. गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर तो नदीपात्राच्या दिशेने घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. हा पुतळा नदीपात्रात फेकला असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा पुतळा पालिका प्रशासन आणि पोलीस या दोघांनाही अद्यापही सापडला नाही.

स्थायी समितीच्या सभागृहाला टाळे ठोकले
या घटनेचे पुणे महापालिकेत पडसाद उमटले. स्थायी समितीची बैठक होत असलेल्या सभागृहाला भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी टाळे ठोकले. अखेर आयुक्त कुणाल कुमार यांंनी हा पुतळा पुन्हा बसविण्यात येईल असे आश्‍वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पुतळा पुन्हा उभा करू – महापौर जगताप
गडकरी यांचा पुतळा हटवून पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या शक्तींमार्फत हा प्रयत्न होत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करू असे पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

राजकीय फायदा घेण्यासाठीच हे षडयंत्र
राम गणेश गडकरी यांनी अत्यंत प्रभावी लेखन केले. ‘राजसंन्यास’मधील त्यांच्या आशयावर मतभेद असू शकतात. पण ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ यासारखी उत्तम नाटकेही त्यांनी लिहिली. ती लोकप्रिय झाली. १९६२ मध्ये उभारलेला त्यांचा पुतळा तोडून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समाजात तेढ निर्माण करण्याचे आणि मतांचे ध्रुवीकरण करून राजकीय फायदा घेण्याचे हे षड्यंत्र आहे. आक्षेप असेल तर ‘राजसंन्यास’वर बंदीची मागणी केली जाऊ शकत होती, पण साठ वर्षांपूर्वीचा पुतळा तोडणार्‍यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची जाणीव झाली असावी, त्यांचा निषेध असो!
आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, शिवसेना उपनेता

‘पुतळे’ तोडण्यापेक्षा अठरापगड तींची सांगड घाला!
‘राजसंन्यास’ नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा ही त्या काळात उपलब्ध ऐतिहासिक संदर्भावर आधारित आहे. त्यातील चित्रण व नंतर संशोधनातून समोर आलेले वास्तव यात नक्कीच तफावत आहे. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्ज्वल्य, स्वराज्यरक्षक व प्रेरणादायक इतिहासाविषयी कुणाच्याच मनात शंका असण्याचे कारण नाही. परंतु गडकरी यांचे साहित्य दुर्लक्षित करून केवळ ठरावीक कारणासाठी रोष ठेवून पुतळ्यावर तो व्यक्त करणे निश्‍चितच योग्य नाही. विचारांची लढाई विचारांनी लढली जावी. संभाजी महाराजांचा योग्य, वास्तव इतिहास समोर येण्यासाठी उत्तमोत्तम साहित्यकृती, कलाकृती आल्या तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. ‘पुतळे’ लक्ष्य करण्यापेक्षा ‘अठरापगड जातींची सांगड घालून उदात्त उद्दिष्ट साध्य करावे’ ही महाराजांची शिकवण पुतळा तोडणार्‍यांनी लक्षात ठेवावी.
– डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना प्रवक्ते

पुतळ्याचे यंदाचे ५५ वे वर्ष
पुणे महापालिकेने जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या ४३व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा पुतळा बसवला. राम गणेश गडकरी स्मारक समितीने हा पुतळा पुणे महापालिकेला भेट दिला होता. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा ब्राँझचा अर्धाकृती पुतळा ए. व्ही. केळकर यांनी घडवला होता. यंदा त्याला ५५ वर्षे पूर्ण होणार होती. पुतळ्याच्या चौथर्‍यावर ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘प्रेमसंन्यास’ आणि ‘राजसंन्यास’ या नाटकांची नावे कोरलेला ताम्रपट आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा कांगावा
राजसंन्यास या नाटकातून गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा कांगावा केला जात होता. त्याचबरोबर गडकरी यांचा पुतळा तेथून हटवावा अशी मागणी केली होती. अखेर मंगळवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास चार विकृत जातीयवाद्यांनी हातोडा आणि कुर्‍हाडीचे घाव घालत राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडला आणि तो मुठा नदीच्या पात्रात फेकून दिला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले घृणास्पद दृश्य
सकाळी बागेत फिरायला येणार्‍या नागरिकांना नाटककार गडकरी यांचा पुतळा गायब असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांना मध्यरात्री १.५० मिनिटांनी चौघेजण घटनास्थळी आले आणि त्यांनी हातोडे आणि कुर्‍हाडीचे घाव घालून पुतळा फोडल्याचे घृणास्पद दृश्य दिसले.

हे आहेत गुन्हेगार
या घटनेनंतर पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी सीसी टीव्ही फुटेज पाहून तपास सुरू केला आणि दुपारी चारच्या सुमारास हर्षवर्धन मगदूम (२३), प्रदीप कणसे (२५), स्वप्नील काळे (२४), गणेश कारले (२६) यांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी हर्षवर्धन हा संभाजी ब्रिगेडचा हवेली तालुका अध्यक्ष असल्याचे पुढे आले.

पुतळा पुन्हा त्याच जागी बसवणार
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गडकरी यांचा पुतळा हटविण्याचा कृत्याचा सर्वपक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ही पुण्याची संस्कृती नाही. विचाराची लढाई विचारानी लढली पाहिजे, असे शिवसेनेसह सर्व पक्षांनी ठणकावून सांगितले. त्यावर या उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले. हा पुतळा बसवेपर्यंत येत्या दोन दिवसांत तेथे तैलचित्र लावावे अशी सूचना काँग्रेसचे गटनेते, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या