पुणे – कोरोना तपासणीसाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, नगरसेविकेच्या पतीसह पुतण्याला अटक

916

कोरोना पेशंटला रुग्णालयात दाखल करून घेत नाही. मग सर्व्हे करायला कशाला येता अशी विचारणा करीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबीयाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या नगरसेविकेच्या पतीसह पुतण्याला खडकी पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे येथील रेंजहिल इस्टेटमध्ये घडली.

किरण शंकर पहिलवान (वय 40) आणि कैलास डेमाजी पहिलवान (वय 50 दोघेही रा. नीता अपार्टमेंट, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कैलास पहिलवान हे खडकी कन्टोन्मेंट बोर्डाच्या अपक्ष नगरसेविका वैशाली पहिलवान यांचे पती आहेत तर किरण हा पुतण्या आहे.

याप्रकरणी डॉ. शाहिल चारताकुडक यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहिल खडकीतील ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ते हॉस्पिटलमधील स्टाफ आणि स्वतः रेंजहिल परिसरात कोरोनाचा सव्र्हे करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित विभागातील नगरसेविकेचे पती आणि पुतण्याला त्याठिकाणी बोलावून घेतले.

त्यावेळी तेथे आलेल्या किरण आणि कैलास यांनी डॉक्टरांना ‘तुम्ही कोविड पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाही, माझ्या वडिलांना काल तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात पाठविले, मग सर्व्हे करायला कशाला येता’ असे म्हणत डॉक्टरांसह टीमला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी डॉ. शाहिल यांना हाताने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या