घरच्यांनी नाकारले… जेष्ठ नागरिक कक्षाने आपलेसे केले, पुण्यात दीड वर्षांत 938 जेष्ठांना मिळाला आधार

उतारवयात जेष्ठ नागरिकांचा आधार हिरावून घेत नातलगांनी त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. संपत्ती, घरदार, जमीन, सोने-नाणे, ताब्यात घेत आई-वडिलांसह काका-काकी आणि जवळच्या नातलगांना सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र, पुणे पोलिसांनी जेष्ठ नागरिक कक्षाने नातलगांना कायद्याचा धाक दाखविल्यामुळे तब्बल 938 जेष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मागील पावणेदोन वर्षांच्या कालावधीत जेष्ठ नागरिक कक्षाने बहुतांश अर्जांवर तोडगा काढून तक्रारदारांना न्याय दिला आहे.

पुणे पोलिसांच्या जेष्ठ नागरिक कक्षाकडून तक्रारदारांना दिलासा देण्याचे काम केले आहे. विशेषतः संपत्तीसाठी-वडिलांचा छळ करणे, त्यांना घरातून हाकलून देणे, सासू-सुनेच्या वादातून त्यांचा शारिरीक व मानसिक छळ करणे, किरकोळ कारणावरून आई-वडिलांसह इतर नातलगांना बेघर करणे याप्रकारे होणाऱ्या छळवणुकीमुळे जेष्ठांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यापार्श्वभूमीवर जेष्ठ नागरिक कक्षाकडे प्राप्त तक्रारींची तातडीने उकल करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार उपायुक्त श्रीनिवास घाडगे व एसीपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगिता बोडखे यांनी जेष्ठ तक्रारदारांना न्याय देण्याचे काम केले आहे.

मुला-मुलींसह जवळच्या नातलगांकडून जेष्ठांना शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता. त्याशिवाय मालमत्तेचा वाद, आर्थिक फायद्यासाठी आई-वडिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यापाश्र्वभूमीवर जेष्ठांच्या तक्रारींची तातडीने निराकरण करण्यासाठी पोलिसांकडून कक्षाद्वारे प्राधान्य देण्यात आले. 2021 मध्ये जेष्ठ नागरिक कक्षाकडे 582 तक्रारी अर्ज दाखल झाले होते. संबंधित सर्व अर्जांनुसार नातलगांना कायद्याचा धाक दाखवून प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आली. तर 2022 मध्ये दाखल 421 पैकी 356 जेष्ठांना न्याय देण्यात आला असून इतर प्रकरणांचीही सोडवूण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

84 वर्षीय चुलतीला फसविणाऱ्या पुतण्याला हिसका

वयोवृद्ध चुलतीला गोड बोलून चार एकर जमीन पुतण्याने नावावर केली. त्यातील थोडीसी रक्कम चुलतीला दिली होती. मात्र, पुतण्याने जमीनीचा आर्थिक व्यवहार पुर्ण न करता फसवणूक केल्याचा अर्ज जेष्ठ नागरिक कक्षात प्राप्त झाला. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक योगिता बोडखे यांनी संबंधिताला बोलावून घेत, कायद्याचा धाक दाखविला. त्यानंतर पुतण्याने जमीन व्यवहारातील उरललेली 4 लाखांची रोख रक्कम चुलतीला दिली.

आर्थिंक वादासह जमीन आणि दागदागिने लुबाडल्याच्या जेष्ठांच्या तक्रारींवर तोडगा काढण्यात येत आहे. प्रामुख्याने बहुतांश घटनांमध्ये जवळचे नातलग सहभागी असतात. त्यांना समजावून जेष्ठांना दिलासा देण्यात येतो. – योगिता बोडखे, सहायक पोलिस निरीक्षक, जेष्ठ नागरिक कक्ष

उतारवयात आई-वडिलांसह इतर परिचित नागरिकांना जवळच्या नातलगांकडून फसविले जाते. त्यांची हेळसांड करून दुःखात लोटल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार जेष्ठांना दिलासा देण्यासाठी तातडीने दखल घेउन मध्यम मार्ग काढण्यात येत आहेत. त्याशिवाय कायद्याचा धाकामुळे तक्रारदारांना पुन्हा आनंदात जीवन जगण्यास मार्ग मिळत आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर