
हरवलेला मोबाईल परत मिळणे याची शाश्वती कमी असताना शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे 15 मोबाईल परत मिळवून दिले आहेत. हे सर्व महागडे मोबाईल असून यातील अनेक मोबाईल हे परजिल्ह्यासह आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटकसह इतर राज्यातून मिळविले आहेत. गहाळ झालेला महागडा मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
मोबाईल चोरी गेल्यानंतर किंवा गहाळ झाल्यानंतर अनेकदा तो परत मिळेल, याची शाश्वती नसते. मोबाईलमधील महत्वाचा डेटा आणि इतर माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी नागरिक पोलिसांकडून तक्रार देतात. नागरिकांकडून आलेल्या याच तक्रारींचा अभ्यास करून शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर कक्षाने शिवाजीनगर कार्यक्षेत्रातून चोरी गेलेले 15 मोबाईन शोधून काढले आहेत. मोबाईलचा आयएमईआय नंबर, लोकेशन ट्रेस करण्यासह इतर तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी हे फोन मिळविले आहेत. यातील बहूतांश मोबाईल हे आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात मिळून आले आहेत. मोबाईलचे लोकेशन समजल्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांशी त्यांच्या कन्नड, तेलगू या भाषेत संवाद साधून मोबाईल शोधण्यात आले आहेत. अडीच लाख रुपये किंमतीचे १५ मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांना परत केले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरिंवद माने, पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, भोलेनाथ अहीवळे, हवालदार अविनाश भिवरे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.