शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या आराखड्याला मंजुरी

‘पीएमआरडीए’च्या बैठकीत निर्णय
पुणे– शहरातील बहुचर्चित पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाच्या सर्वंकष प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) ‘पीएमआरडीए’च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहराला ‘आयटी हब’ अशी ओळख प्राप्त करून देणार्‍या हिंजवडी आयटी पार्क येथील वाहतुकीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीची (पीएमआरडीए) बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत या मार्गाच्या आराखड्यास मंजुरी मिळाली. यावेळी ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. घोषणेला फक्त तीन दिवसच उलटले असताना, हा ‘सुपर फास्ट’ निर्णय घेऊन पुणेकरांना नववर्षाची भेट दिली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचा दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडून सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे.

हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क येथे दोन लाख कर्मचारी वर्ग प्रत्यक्षपणे कार्यरत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुचाकी आणि चारचाकी अशी सुमारे १.५ ते २ लाख वाहनांची वर्दळ या मार्गावर असते, तर सार्वजनिक आणि खासगी अशा एकूण ८८५ बसेस याच मार्गावरून येत-जात असतात. त्यामुळे हिंजवडी येथील भेडसावणार्‍या वाहतूक समस्येवर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग चांगला पर्याय ठरणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी या तब्बल साडेतेवीस कि.मी.च्या या मेट्रो मार्गाचा आराखडा दिल्ली मेट्रो कार्पोरेशनने तयार केला आहे. साधारण ३१ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गावर २३ ते २५ स्थानके असतील. दर अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर हे स्थानक असेल. प्रत्येक स्थानक सहा डबे क्षमतेचे असेल. यासाठी ३१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाला साधारण साडेसात हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यातील २० टक्के केंद्र सरकार, २० टक्के राज्य सरकार, १० टक्के भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण उचलणार आहे. उरलेला खर्च खासगी-सार्वजनिक भागीदारी माध्यमातून किंवा इतर पद्धतीनुसार ठेकेदारांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. यासाठी आवश्यक असणार्‍या केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या चार ते पाच महिन्यांच्या आत आणण्याचा प्रयत्न आहे.

येत्या तीन ते साडेतीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. विशेष म्हणजे याच बैठकीत ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून हा निधी उभारला जाणार असल्याचीही घोषणा झाली. एकीकडे पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी दहा वर्षांची वाट पाहावी लागली असताना, दुसर्‍या टप्प्यातील मेट्रोचा मार्ग मात्र अल्पावधीतच सुकर झाला असल्याने पुणेकरांना आता ‘अच्छे दिन’ अनुभवता येणार आहेत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडला मंजुरी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवतीच्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या रिंगरोडला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शासनापुढे ‘पीएमआरडीए’च्या बरोबरीने महाराष्ट्र विकास रस्ते महामंडळाच्या रिंगरोड असे दोन प्रस्ताव होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडचा आराखडा मंजूर करण्यात आला.