‘धनुष्यबाण’ हाच आमचा उमेदवार

शिवसेनेतील इच्छुकांचा निर्धार

पुणे – शिवसेनेकडून महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे. मात्र, शिवसेनेकडून कोणालाही तिकीट मिळो, आम्ही नाराज होणार नाही. ‘धनुष्यबाण’ हाच आमचा उमेदवार आहे, असे समजून तन, मन, धनाने शिवसेनेसाठी काम करू, असा निर्धार ‘उमेदवार प्रशिक्षण शिबिरा’मध्ये शिवसेनेतील इच्छुकांनी केला. मतदारांसमोर कसे जावे, कसे बोलावे, आपली कामे कशी पोहोचवावीत याचे धडेही शिबिरामध्ये गिरविण्यात आले.

शिवसेनेतर्फे महापालिका निवडणुकीसाठी आयोजित ‘उमेदवार प्रशिक्षण शिबिरा’स इच्छुक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कपड्यांपासून मीडिया सेलपर्यंतच्या सर्व गोष्टींवर यात मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, माजी मंत्री शशिकांत सुतार, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहरप्रमुख विनायक निम्हण, शहरसंघटक श्याम देशपांडे, अजय भोसले, सचिन तावरे, महिला आघाडीच्या निर्मला केंडे आदी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी ‘निवडणूक व प्रसिद्धी माध्यमे’ मतदारयादीचे वाचन कसे करावे यावर दीपक शेडे, ‘संभाषणकौशल्य’ या विषयावर विनय मोरे यांनी मार्गदशर्र्न केले.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेनेतर्फे निवडणूक लढण्यास प्रभागामध्ये दहा-दहाजण इच्छुक आहेत. कोणालाही उमेदवारी मिळाली तरी त्याला निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार उर्वरित इच्छुकांनी केला. शिबिरामध्ये स्वाती मोहोळ, राहुल वांजळे, राहुल शिरोळे, आरती शिरोळे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

आचारसंहितेचे पालन व्हायलाच हवे
निवडणूक म्हटले की आचारसंहिता आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे नियम नेहमी बदलत असतात. प्रत्येक उमेदवाराने या नियमांचे आकलन करून घ्यायला हवे. आचारसंहितेचे नियम समजावून घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करा. निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचे पालन व्हायलाच हवे, असा सल्ला खासदार अनिल देसाई यांनी दिला.

डॉ. कोल्हे यांचा इच्छुकांशी संवाद
डॉ. अमोल कोल्हे यांनी इच्छुकांशी संवाद साधला. इच्छुकांनी आपल्या मनातील विविध प्रश्‍न डॉ. कोल्हे यांना विचारले. या प्रश्‍नांमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत युती होणार का? हा प्रश्‍न अनेकांनी विचारला, तर युती करूच नका, आपण स्वबळावर लढू, अशी सूचना अनेक इच्छुकांनी मांडली. युतीसंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. निर्णय काहीही होवोत, आपण निष्ठेनेे काम करू, असे डॉ. कोल्हे म्हणाले.

बाहेरून येणार्‍यांनी दुधातील साखरेसारखे राहावेवसेनेमध्ये अनेक लोक बाहेरून येत असून ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. प्रभागरचना व तेथील परिसराचा अभ्यास करून उमेदवारी दिली जाईल. यामध्ये त्यांना उमेदवारी मिळेलच असे नाही. मात्र, तिकीट मिळो न मिळो बाहेरून येणार्‍यांनी दुधातील साखरेप्रमाणे गोड राहावे, असा सल्ला डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. उमेदवारी देताना निष्ठावान शिवसैनिकाचा आधी विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.