स्मार्ट सिटी, २४ तास पाणी, वाहतुकीची कामे पूर्ण करणार

23

पुणे – गेल्या वर्षभरात पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीसह सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणी, पथदिवे अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले आहे. नवीन वर्षात मेट्रो, २४ तास पाणी योजना, सार्वजनिक वाहतुकीच्या कामांना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

महापालिकेने गेल्या वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा आयुुक्त कुणाल कुमार यांनी घेताना आगामी वर्षात करण्यात येणार्‍या कामांचा वेध घेतला. केंद्र व राज्य सरकारकडून स्वच्छता व अन्य काही क्षेत्रांतील कामांसाठी पालिकेचा गौरव करण्यात आला. स्मार्ट सिटी स्पर्धेत पालिकेला देशात दुसरा क्रमांक मिळाला. शहराचा सर्वंकष विचार केला जात असल्यामुळेच हे शक्य होत आहे. मेट्रो, नदीसुधार, २४ तास पाणीपुरवठा या योजनांसारख्या मोठ्या योजनांची पायाभरणी मागील वर्षात झाली. बीआरटी मार्ग सुरू झाले. एचसीएमटीआर रस्त्याचा आराखडा तयार करण्यात आला. स्मार्ट सिटीअंतर्गत काही कामे सुरू झाली. मिळकतकरासाठी ऑनलाइनसह अन्य अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या. ‘पुणे कनेक्ट’ अ‍ॅप तयार करून त्यातून नागरिकांना तक्रारी करता येतील व त्याचे संबंधित खात्यांमार्फत वेळेत निराकरण होईल, अशी व्यवस्था झाली.

शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मेट्रोचा पर्याय आहेच, त्याशिवाय पीएमपीएल सक्षम करणे, रस्ते प्रशस्त करणे, उच्च तंत्रज्ञान असलेले दिशादर्शक दिवे बसविणे, सायकल शेअरिंगसारखा उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू करणे, असे उपाय करण्यात येत आहेत. पीएमपीएलच्या ताफ्यात लवकरच १ हजार ५०० बस दाखल होतील. पीएमपीएलच्या सर्व वाहतुकीसाठी एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीचे काम संथ गतीने सुरू आहे, अशी टीका होते. मात्र, ही कामे संथ गतीनेच व्हायला हवीत, कारण त्यात एकही चूक, त्रुटी राहायला नको, असे स्पष्ट करून कुणाल कुमार म्हणाले, बाणेर येथे या योजनेंतर्गत ‘स्टार्ट अप हब’ सुरू करण्यात येत आहे.

अडीच लाख चौरस फुटांवर ही इमारत असून, त्याचे काम सुरू झाले आहे. डॅश बोर्ड, पुणे कनेक्ट, पुणे डाटा स्टोअर, यांबरोबरच नागरिकांना उपयोगी पडणारी अनेक नवीन अ‍ॅप्स पालिका विकसित करीत आहे. त्यामुळे घरबसल्या मिळकत कर जमा करता येईल. संगणक साक्षरता वाढविण्यासाठी सध्या पालिकेची काही फिरती वाहने कार्यान्वित आहेत. येत्या वर्षभरात अशी १०० केंद्रे सुरू करण्यात येतील. सन २०२० पर्यंत संपूर्ण पुणे शहर संगणक साक्षर होईल, या पद्धतीने या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

पालिकेच्या वतीनेच अत्याधुनिक रोग निदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यात सवलतीच्या दरात नागरिकांना विविध प्रकारच्या तपासण्या करता येतील. सोलर सिटी, नागरी सुविधा केंद्र, विद्यार्थ्यांच्या रोजगार कौशल्यात वाढ करण्यासाठी त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करणारी लाइट हाऊस, अग्निशमन केंद्र, पथदिव्यांसाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्ष अशा वेगवेगळ्या कामांना सुरुवात करण्यात आली असून, पुढील वर्षात त्याकडे लक्ष देऊन हे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या